Indigo ची भन्नाट ऑफर; आता बँकॉक फक्त साडेतीन हजारात, तर दुबई पाच हजारात
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

परदेशगमन ही प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र विविध कारणांनी प्रत्येकाचेच हे स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. आधी व्हिजा मिळवण्यासाठी धावाधाव, त्यानंतर तिकिटांसाठी मारामार. अशातच आंतरराष्ट्रीय विमानप्रवासाचे आकाशाला भिडलेले दर पाहता, सर्वसामान्यांना ही अगदी आवाक्याबाहेरचीच गोष्ट वाटते. ही समस्या ओळखून इंडिगो (Indigo) या विमानसेवा देणाऱ्या कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली आहे. ‘फॉरेन स्काईज, लोकल फेअर्स’ असे या ऑफरचे नाव असून, या ऑफर अंतर्गत आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे तिकीट हे फक्त 3,299 रुपयांपासून सुरु होणार आहे. यासाठी तुम्हाला 12 ते 16 डिसेंबर दरम्यान तुमच्या प्रवासाचे तिकीट बुक करावे लागेल. 2018 मधील इंडिगोची ही सर्वात उत्कृष्ट ऑफर असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा :आता व्हिसाशिवाय फिरू शकता हे सुंदर देश)

12 ते 16 डिसेंबरदरम्यान इंडिगोची ही ऑफर चालू असणार आहे. या कालावधीमध्ये बुक केलेल्या तिकिटांवर तुम्ही 27 डिसेंबर 2018 ते 15 एप्रिल 2019 पर्यंत प्रवास करू शकाल. या ऑफरमधील सर्वात कमी तिकीट दर हे 3,299 आरके आहे. तुम्ही बुक करत असलेले तिकीट आणि प्रवासाची तारीख यांमध्ये कमीतकमी 15 दिवसांचा कालावधी असणे गरजेचे आहे. मात्र ही ऑफर ग्रुप बुकिंगसाठी लागू असणार नाही.

सध्या इंडिगो कंपनीकडून 63 ठिकाणांसाठी 1200 विमानसेवा पुरवल्या जातात. यातील 49 ठिकाणे ही भारतातील तर 14 ठिकाणे आंतरराष्ट्रीय आहेत. सध्या चालू असलेल्या या ऑफरमधील तिकिटांच्या किमती अशा प्रकारे असतील - या ऑफरमध्ये बँकॉकचे तिकीट साडे तीन ते चार हजार असून दुबईचे तिकीट हे अवघे पाच हजार रुपये आहे. चेन्नई ते दुबईपर्यंतचे फ्लाइटचे भाडे 5,199 आहे. चेन्नई ते सिंगापूर 5,799 रुपये, बंगळुरू ते बँकॉक 6,099, दिल्ली ते दुबई 6,299 रुपये, क्वालालंपूर ते दिल्ली 6,899 रुपये इतके आहे.