2010 ते 2019 या कालावधीमध्ये भारताच्या लोकसंख्य (India's population) मध्ये 1.2 टक्के वार्षिक दराने वाढ झाली असून, सध्या भारताची लोकसंख्या 136 कोटींवर पोहोचली आहे. हा दर चीनच्या लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा दुप्पट असल्याचे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (United Nations Population Fund) च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. 1994 मध्ये भारताची लोकसंख्या 94.22 कोटी आणि 1969 मध्ये 54.15 कोटी होती. तर चीनची लोकसंख्या 2019 मध्ये 142 कोटींवर पोहोचली आहे. ही 1994 मध्ये 123 कोटी, तर 1969 मध्ये 80.36 कोटी इतकी होती.
चीनच्या लोकसंख्येमध्ये 2010 ते 2019 या कालावधीमध्ये 0.5 टक्के वार्षिक दराने वाढ झाली आहे. भारतामध्ये 1969 साली प्रति महिला प्रजनन दर 5.6 होता, तो 1994 मध्ये 3.7 इतका झाला तर 2019 मध्ये तो 2.3 इतका आहे. तर 1969 मध्ये सरासरी आयुर्मान हे 47 वर्ष होते. 1094 मध्ये 60 वर्ष झाले आणि आता 2019 मध्ये ते 69 वर्ष झाले आहे.
या अहवालानुसार देशातील सहा टक्के लोकसंख्या ही 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाची आहे. 27 टक्के लोकसंख्या 0 ते 14 वर्षे तसेच 27 टक्के लोकसंख्या 10 ते 24 वर्षे वयाची आहे. देशातील 67 टक्के लोकसंख्या 15 ते 64 वर्षे वयाची आहे. भारताच्या आरोग्य सुविधा प्रणालीच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. देशात माता मृत्यूदर 1994 मध्ये एक लाखांमागे 488 इतका होता. त्यात घट होऊन 2015 मध्ये हा दर प्रती लाख 174 मृत्यू इतपर्यंत खाली आला आहे. (हेही वाचा: येत्या 40 वर्षांत भारत होईल सर्वाधील मुस्लीम लोकसंख्या असलेला देश; पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर)
दरम्यान नुकतीच पुढील 40 वर्षांमध्ये भारत हा सर्वाधील मुस्लीम लोकसंख्या असलेला देश होईल, अशी माहिती अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरच्या (Pew Research Center) अहवालातून समोर आली आहे. 2060 मध्ये भारतातील मुस्लिम धर्मीयांची संख्या 33 कोटी तीस लाख नव्वद हजार इतकी असेल. त्या वेळी भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिम धर्मीयांचे प्रमाण 19.4 टक्के होईल,सध्या हे प्रमाण 14 टक्के आहे.