येत्या 40 वर्षांत भारत होईल सर्वाधील मुस्लीम लोकसंख्या असलेला देश; पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

पुढील 40 वर्षांमध्ये भारत हा सर्वाधील मुस्लीम लोकसंख्या असलेला देश होईल, अशी माहिती अमेरिकन थिंक टँक प्यू रिसर्च सेंटरच्या (Pew Research Center) अहवालातून समोर आली आहे. सध्या इंडोनेशिया (Indonesia) देशात सर्वाधिक म्हणजे 21 कोटी 99 लाख मुस्लिम धर्मीय वास्तव्यास आहेत. या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे, त्यानंतर पाकिस्तान देशाचा नंबर लागतो, नंतर बांगलादेश आणि नायजेरिया. मात्र येत्या 40 वर्षांमध्ये इंडोनेशियाला मागे टाकत भारतात सर्वाधीक मुस्लीम असणार आहेत. सध्या भारतात 19.4 कोटी मुस्लीम लोक राहतात. 2060 मध्ये सर्वाधिक मुस्लिम आणि ख्रिश्‍चन धर्मीय लोकसंख्या असलेल्या देशांची यादी ‘प्यू रिसर्च सेंटर’ने प्रसिद्ध केली आहे.

2060 मध्ये भारतातील मुस्लिम धर्मीयांची संख्या 33 कोटी तीस लाख नव्वद हजार इतकी असेल. त्या वेळी भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिम धर्मीयांचे प्रमाण 19.4 टक्के होईल,सध्या हे प्रमाण 14 टक्के आहे. तर जगातील एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या 11.1 टक्के लोकसंख्या भारतात वास्तव्यास असेल.

(हेही वाचा: बहुसंख्येने मुस्लिम असलेल्या 'या' देशाच्या नोटेवर आहे गणपती बाप्पा)

सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तान आणि नायजेरिया या देशांना अनुक्रमे दुसरा तसेच तिसरा क्रमांक प्राप्त होणार आहे.. 2060 मध्ये पाकिस्तानातील 96.5 टक्के लोकसंख्या मुस्लिम असेल. तर जगातील एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी 9.5 टक्के मुस्लिम पाकिस्तानात वास्तव्यास असतील. सध्या पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या मुस्लिम धर्मीयांची संख्या 18 कोटी 40 लाख आहे.