एकाच पोझिशनवर पण दोन वेगवेगळ्या शहरांत, दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या पगारामध्ये तफावत आढळून येते. म्हणूनच देशात सर्वात जास्त पगार कोणत्या शहरात मिळतो असा प्रश्न विचारला असता, साहजिकच देशाची आर्थिक राजधानी मुंबई अथवा देशाची राजधानी दिल्लीचे नाव डोळ्यासमोर येईल, मात्र हे चूक आहे. ‘लिंक्डइन’ने नुकतेच याबाबत एक सर्वेक्षण केले होते, आणि आश्चर्य म्हणजे या सर्वेक्षणात बंगळुरु हे शहर अग्रस्थानी आहे. म्हणजेच देशातील बंगळुरु या शहरात सर्वात जास्त पगार मिळतो. यानंतर मुंबई आणि दिल्लीचा क्रमांक लागतो.
लिंक्डइन गेले दोन महिने याबाबत सर्वेक्षण करीत होते. यातून देशाचे आयटी हब अशी ओळख असलेल्या बंगळुरु येथे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार मिळतो असे समोर आले आहे. बंगळुरु शहरातील मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या पॅकेजची आकडेवारी डोळे विस्फारणारी आहे. इथल्या कंपन्या एका कर्मचाऱ्याला वार्षिक सरासरी 11.67 लाख रुपयांचे पॅकेज देतात. यानंतर मुंबई (9.03 लाख रुपये) दुसऱ्या, तर दिल्ली-एनसीआर (8.99 लाख रुपये) तिसऱ्या स्थानावर आहे. तर चौथ्या क्रमांकावर हैदराबाद (8.45 लाख रुपये) आणि पाचव्या स्थानावर चेन्नई (6.30 लाख रुपये) आहे.
याच सर्वेक्षणातून हार्डवेअर अॅण्ड नेटवर्किंग, सॉफ्टवेअर अॅण्ड आयटी सर्व्हिसेस आणि कन्झ्युमर सेक्टरच्या क्षेत्रात सर्वात जास्त पगार मिळत असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान जर देशांबद्दल विचार केला गेला तर, 'वर्ल्ड टॅलेंट रेटिंग-2017'च्या यादीप्रमाणे स्विर्त्झलँड या देशात सर्वात जास्त पगार दिला जातो. रिपोर्टनुसार, तिथे सर्विस सेंटरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना सरासरी 92,625 डॉलर म्हणजेच जवळपास 63. 60 लाख रुपये इतका पगार मिळतो. त्यानंतर अमेरिका, लग्जमबर्ग, हाँगकाँग, जपान आणि जर्मनीचा नंबर लागतो.