Gujarat Hospital Fire: भावनगरमधील जनरेशन हॉस्पिटलमध्ये भीषण आग, ICU मध्ये 70 रुग्णांवर सुरू होते उपचार
Fire | Image only representative purpose (Photo Credits: Pxhere)

Gujarat Hospital Fire: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील रुग्णालयांमध्ये आग लागण्याच्या घटना सुरूचं आहेत. गुजरातमधील भावनगर येथील जनरेशन हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. आयसीयू बेड्स असलेल्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली असल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा ही आग लागली त्यावेळी 70 हून अधिक रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. या सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे हॉस्पिटल व्यवस्थापकांनी सांगितले आहे. आग लागताच सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे. यामुळे, कोणत्याही पेशंटचा मृत्यू झाला नाही. या क्षणी अग्निशमन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. कित्येक तासांच्या मेहनतनंतर आग विझविण्यात यश आलं. (वाचा - Oxygen Tank Leakage at South Goa District Hospital: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन टँकर गळती, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल)

रुग्णालयात भीषण आग लागली तेव्हा परिसरात अनागोंदीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर तात्काळ रुग्णांना बाहेर काढण्यात आले. बरेच रुग्ण ऑक्सिजनच्या आधारावर होते. त्यांना ऑक्सिजन सिलिंडर घेऊन बाहेर आणले आणि तत्काळ दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले.

यापूर्वी 30 एप्रिल रोजी रात्री गुजरातच्या भरुच शहरातील पटेल वेलफेयर हॉस्पिटलमधील कोरोना केअर प्रभागात अचानक आग लागली होती. या घटनेत 14 रुग्ण आणि 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. कोरोना वॉर्डमध्ये सुमारे 49 रूग्ण दाखल झाले होते, त्यापैकी 24 रुग्ण आयसीयूमध्ये होते.

भरुचमधील पटेल वेलफेअर हॉस्पिटलच्या दोन दिवस आधी महाराष्ट्रातील ठाणे येथील प्राइम क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये आग लागली होती. आगीनंतर लगेचच रूग्णांना त्वरित दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले. या काळात चार रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेच्या काही दिवस अगोदर मुंबईला लागून विरार भागातील विजय वल्लभ कोविड रुग्णालयात लागलेल्या आगीत 14 लोकांचा मृत्यू झाला होता.