
गुजरातच्या (Gujarat) सुरत (Surat) येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकारासोबत पळून जाऊन लग्न करण्यासाठी एका तरूणीने तिच्या संपूर्ण कुटुंबियांच्या अन्नात विष कालवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 12 सप्टेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी संबंधित तरूणी आणि तिच्या पतीसह तिला मदत करणाऱ्या सासऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हात दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खुशबू असे या तरूणीचे नाव असून तिने इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. खुशबू ही आपल्या कुटुंबियांसोबत सुरतच्या डिंडोली परिसरातील एका सोसायटीमध्ये राहायला होती. दरम्यान, याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या सचिनशी खुशबूची ओळख झाली. त्यानंतर या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. महत्वाचे म्हणजे, खुशबू अल्पवयीन असल्याने तिच्या कुटुंबाचा तिच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. ज्यामुळे खुशबू यांचे कुटुंब दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले. मात्र, तरीही खुशबू आणि सचिन यांच्यात प्रेमसंबंध सुरुच होते. हे दोघेही तिचे अठरा वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहत होते. हे देखील वाचा- Karma Visarjan: कर्मा दल विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, 7 मुलींचा तलावात बुडल्याने मृत्यू
दरम्यान. खुशबूच्या 18 व्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनी तिने तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्याचा बेत आखला आणि दोघांनी 12 सप्टेंबरला तिच्या आईवडिलांना बेशुद्ध करण्यासाठी त्यांच्या रात्रीच्या जेवणात विष कालवले आणि दोघेही फरार झाले. त्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर खुशबू घरात नसल्याने तिच्या पालकांनी चिंता व्यक्त केली. तेवढ्यात स्थानिक पोलीस ठाण्यातून खुशबूच्या वडिलांना फोन आला. तसेच खुशबू ही सचिनसोबत लग्न करून पोलीस ठाण्यात आल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिली.
लग्नाची नोंदणी केल्यानंतर खुशबू आणि सचिनने पोलीस ठाणे गाठले. दोघांचेही वय पूर्ण असल्याचे त्यांना पोलिसांनी सोडून दिले. परंतु, विषारी पदार्थ खाऊन खुशबूच्या कुटंबातील सदस्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी खुशबू, सचिन आणि त्यांना मदत करणाऱ्या अशोक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.