Representational Image (Photo Credits: File Image)

गोव्यातील खोर्ली-म्हापसा (Khorli Mhapasa in Goa) येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या (Suicide) केली आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. हे कुटुंब कोल्हापूरमधील गडहिंग्लज येथील आहे. गेल्या काही वर्षांपासून हे कुटुंब गोव्यात राहत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या सर्व प्रकारानंतर म्हापसा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शाहू धुमाळे (वय 41), कविता धुमाळे (वय 34), पारस धुमाळे (वय 9) आणि साईराज धुमाळे (अडीच वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून सुसाइड नोट सापडल्याची माहिती म्हापसा पोलीस स्थानकाचे अतिरिक्त उपअधीक्षक एडविन कुलासो यांनी माध्यमांना दिली. (हेही वाचा - सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यावरील दुमजली उड्डाणपूलाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास महापालिकेचा नकार)

प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. यातील शाहू धुमाळे यांचा मृतदेह हॉलमध्ये पंख्याला लटकलेला सापडला. तसेच पत्नी कविता व दोन्ही मुलांचे मृतदेह बेडरूममधील कॉटवर सापडले. म्हापसा पोलिसांनी हे चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

दरम्यान, मागील महिन्यात गडचिरोलीमध्ये मुलीने पळून जाऊन लग्न गेल्याने आई, वडील आणि भावाने सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या तिघांनी त्यांच्या घरामागे असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. देशात अशा प्रकारे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून लोक आपली जीवन यात्रा संपवत आहेत.