
मागील आठवड्यात गुजरातमधील (Gujarat) भूज येथील मुलींच्या वसतीगृहात राहणाऱ्या 68 तरुणींना मासिक पाळीचा पुरावा देण्यासाठी महिला शिक्षिकांसमोर निर्वस्त्र व्हावं लागलं होतं. ही बातमी ऐकून सर्वांना धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा सुरतमध्ये (Surat) 100 ट्रेनी क्लर्क पदावर काम करणाऱ्या महिलांना निर्वस्त्र करत त्यांची वैद्यकीय चाचणी (Medical Test) करण्यात आली आहे. एवढचं नाही तर या महिलांना चाचणीदरम्यान खाजगी आयुष्यावर प्रश्नही विचारण्यात आले आहेत.
गुजरात सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सुरत महापालिकेच्या एका रुग्णालयात हा सर्व प्रकार घडला आहे. महिला कर्मचाऱ्यांना आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची वाच्यता केल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. महापालिकेच्या 100 ट्रेनी महिला कर्मचाऱ्यांना फिटनेस टेस्टसाठी सुरत शहर आयुर्विज्ञान आणि संशोधन संस्थेमध्ये नेण्यात आले होते. यावेळी या महिला ट्रेनी क्लर्कना गटा-गटाने निर्वस्त्र उभे राहण्यास सांगण्यात आले. तसेच त्यांना सेक्शुअल आयुष्यावरही प्रश्न विचारण्यात आले. (हेही वाचा - गुजरात: भूज मधील मुलींच्या कॉलेजमध्ये वसतिगृहाच्या वॉर्डनच्या तक्रारीवरून मुलींची अंतवस्त्र उतरवली; मासिकपाळी दरम्यान मंदिर आणि किचनमध्ये प्रवेश केल्याचा आरोप)
विशेष म्हणजे या महिला कर्मचाऱ्यांना ज्या खोलीत निर्वस्त्र उभं करण्यात आलं होतं त्या खोलीचा दरवाजाही नीट बंद करण्यात आला नव्हता. या महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्यासोबत फिगर टेस्टसह गैरव्यवहार करण्यात येत होता. यातील अविवाहित असलेल्या महिलांना तेथील महिला डॉक्टरांनी तुम्ही गर्भवती झालेला का? असा प्रश्नही विचारला. या सर्व प्रकारानंतर संबंधित रुग्णालयाच्या स्त्री रोग विभाग प्रमुख आश्विन वछानी यांनी सांगितले की, येथे रुग्णालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार महिलांची शारीरिक तपासणी केली जाते. पुरुषांची अशा पद्धतीची तपासणी केली जाते की नाही, याबद्दल माहिती नसल्याचंही वछानी यांनी सांगितलं आहे.