S Jaishankar Meets Rishi Sunak (PC - Twitter)

S Jaishankar Meets Rishi Sunak on Diwali: परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर (S Jaishankar) आणि त्यांची पत्नी क्योको जयशंकर यांनी रविवारी दिवाळीनिमित्त (Diwali 2023) ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांची 10 डाउनिंग स्ट्रीट येथे भेट घेतली. यादरम्यान परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी श्रीगणेशाची मूर्ती आणि विराट कोहलीने स्वाक्षरी केलेली क्रिकेट बॅटही पंतप्रधान सुनक यांना भेट दिली.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर यूकेचे पंतप्रधान सुनक यांच्या भेटीची माहिती देताना जयशंकर यांनी सांगितलं की, 'दिवाळीला पंतप्रधान ऋषी सुनक यांना भेटून आनंद झाला. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. भारत आणि ब्रिटन समकालीन काळातील संबंधांची पुनर्कल्पना करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहेत. PM सुनक आणि त्यांच्या पत्नीने हार्दिक स्वागत आणि भव्य आदरातिथ्य केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.' (हेही वाचा -Diwali 2023 Celebration: UK PM Rishi Sunak आणि त्यांची पत्नी Akshata Murthy यांच्याकडून Downing Street मध्ये हिंदू धर्मियांसोबत दिवाळी सेलिब्रेशन (See Pics))

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर शनिवारी ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत. ते 15 नोव्हेंबरपर्यंत ब्रिटन दौऱ्यावर असणार आहेत. आपल्या दौऱ्यात ते ब्रिटनचे आपले समकक्ष जेम्स क्लेव्हरली यांच्याशीही बैठक घेणार आहेत. यादरम्यान, दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री येत्या काही महिन्यांत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या संभाव्य भारत दौऱ्याच्या तयारीवर चर्चा करू शकतात. परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की, दोन्ही देश परस्पर संबंध पुनर्निर्माण करण्यात गुंतले आहेत.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्री जयशंकर त्यांच्या दौऱ्यादरम्यान लॉर्ड्स क्रिकेट मैदानावरील एका कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. सोमवारी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या दिवाळी रिसेप्शनला ते संबोधित करण्याची शक्यता आहे. यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की परराष्ट्र मंत्री जयशंकर 11 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ब्रिटनच्या अधिकृत दौऱ्यावर असतील.