Election Commission bans Anurag Thakur , Parvesh Verma (PC - Facebook)

Delhi Assembly Election 2020: राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षाचा जोरदार प्रचार चालू आहे. 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने (Election Commission) मोठी कारवाई केली आहे. प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आणि खासदार परवेश वर्मा (Parvesh Verma) यांच्याविरोधात कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने अनुराग ठाकूर यांच्यावर 72 तासांसाठी म्हणजे 3 दिवसांसाठी प्रचारात सहभागी होण्यास बंदी घातली आहे. तसेच प्रवेश वर्मा यांच्यावर 96 तासांसाठी म्हणजे 4 दिवसांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांना या कालावधीच प्रचारात सहभाही होता येणार नाही.

दिल्ली विधानसभा प्रचारादरम्यान, अनुराग ठाकूर आणि परवेश वर्मा यांनी प्रक्षोभक भाषण तसेच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाने भाजपला या दोन्ही नेत्यांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीतून काढण्यास सांगितले आहे. (वाचा - Delhi Elections 2020: सत्ता आल्यानंतर दिल्लीतील सरकारी जमिनीवरील मशिदी हटवू; भाजप खासदार प्रवेश वर्मा यांचे प्रक्षोभक वक्तव्य)

अनुराग ठाकूर यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकी दरम्यान 'देश के गद्दारोको गोली मारों', असे वक्तव्य केले होते. तसेच प्रवेश वर्मा यांनी दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सर्व मशिदी हटवू, असं वादग्रस्त विधान केलं होत. त्यामुळे निवडणूक आयोगाने या दोघांना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे.