
Delhi Elections 2020: दिल्लीमध्ये (Delhi) सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Election 2020) प्रचाराचे चित्र पहायला मिळत आहे. यात अनेक नेत विरोधी पक्षावर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. 'दिल्लीत भाजपची सत्ता आली तर, एका महिन्याच्या आत सरकारी जमिनीवरील सर्व मशिदी हटवण्यात येतील', असे वादग्रस्त वक्तव्य पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार प्रवेश वर्मा (Parvesh Verma) यांनी केलं आहे. यासंदर्भात 'लाईव्ह हिंदुस्तान'ने वृत्त प्रकाशित केले आहे.
दिल्लीमधील एका सभेत बोलताना वर्मा म्हणाले की, 'दिल्लीत माझे सरकार आले तर, 11 फेब्रुवारीनंतर एका महिन्यात माझ्या लोकसभा मतदारसंघातील सरकारी जमिनीवरील सर्व मशिदी हटवू. मी एकही मशीद सोडणार नाही,' असा दावाही वर्मा यांनी यावेळी केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (हेही वाचा - Union Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत या 5 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत काय?)
सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी दिल्लीतील शाहीनबागेमध्ये सध्या मुस्लिम महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावरही वर्मा यांनी वक्तव्य केले. दिल्लीत भाजपची सत्ता आली तर, एका तासात शाहीन बाग रिकामी करू. येथे कोण आंदोलन करत आहे, हे सर्वांना माहीत आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याला समजून घ्याचेचं नाही, हा त्यांचा या आंदोलनामागचा हेतू आहे, असंही वर्मा यावेळी म्हणाले.
काश्मीरप्रमाणे दिल्लीच्या एका कोपऱ्यात आग लागली आहे. हे लोक तुम्हाला तुमच्या घरात घुसून मारतील. मोदी नसतील तर, हे लोक तुम्हाला कापून टाकतील. शाहीनबागेत अनेक लोक जमा झाले आहेत. याचा दिल्लीतील जनतेने विचार करावा हवा. हे लोक काही दिवसांनी तुमच्या घरात घुसतील. तुमच्या बहीण-मुलीवर बलात्कार करतील. त्यांची हत्या करतील. तेव्हा मोदी आणि अमित शहा तुम्हाला वाचवायला येणार नाहीत, असे प्रक्षोभक वक्तव्यही वर्मा यांनी यावेली केले आहे.