BMC च्या CBSE आणि ICSE शाळांच्या प्रवेशासाठी आज निघणार ऑनलाईन लॉटरी; 10 मे रोजी जाहीर होणार विद्यार्थ्यांची अंतिम यादी
File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

बीएमसी (BMC) ने आपल्या दोन शाळांमध्ये सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसई (ICSE) बोर्डाचे शिक्षण सुरु करण्याचा विचार केला आहे. याची सुरुवात बीएमसीच्या माहीम आणि जोगेश्वरी इथल्या शाळांपासून होणार आहे. काल रात्री बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, या शाळांमधील प्रवेश प्रक्रियेसाठी लॉटरी सिस्टम आज, 30 एप्रिल रोजी डिजिटल पद्धतीने घेण्यात येणार आहे. लॉक डाऊनमुळे पालक या फेऱ्यांसाठी शारीरिकरित्या उपस्थित राहू शकत नाहीत, त्यामुळे बीएमसी त्यांच्यापर्यंत व्हर्चुअली पोहोचणार आहे. या माध्यमातून बीएमसी खासगी शाळांशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करीत आहे.

बीएमसी ट्विट - 

दोन्ही मंडळांकडून आकारण्यात येणा-या फीसाठी सन 2020-21 च्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी 10 मे रोजी जाहीर केली जाणार आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना औपचारिकता पूर्ण करण्यासाठी गुगल फॉर्मसह एक मेसेज प्राप्त होईल. रिपोर्ट्सनुसार, बीएमसीला सीबीएसई स्कूलसाठी 320 जागांसाठी 2,100 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान, आयसीएसई शाळेसाठी 320 जागांसाठी 343 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. (हेही वाचा: देशातील कोरोना व्हायरस, Lockdown स्थिती सामान्य झाल्यावरच सीबीएसई बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार- केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल)

माहीममधील वूलन मिल बीएमसी स्कूलमध्ये आयसीएसई बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड जोगेश्वरी पूर्व स्थित पूनम नगर बीएमसी स्कूलमध्ये सुरु होईल. ज्यांनी नुकतेच इंग्रजी माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, अशा लोकांना शिक्षक म्हणून नेमण्यात येईल. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या अभ्यासासाठी 50 शिक्षकांची निवड केली जाईल, तर सीबीएसई आणि आयसीएसई विभागात शिक्षकांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाईल. बीएमसी दोन्ही बोर्डांचे शिक्षण विद्यार्थ्यांना मोफत देणार आहे. या दोन्ही मंडळांच्या या शाळांमध्ये ज्युनियर व सिनीयर केजीसह 1 ली ते 6 वी पर्यंतचे वर्ग असतील.