गेल्या अनेक दिवसांपासून जगभरातील मोठ्या टेक कंपन्या आपल्या हजारो कर्मचार्यांना काढून टाकत आहेत. कर्मचाऱ्यांवर आर्थिक मंदीची तलवार लटकलेली असताना, सॅमसंगने (Samsung) बुधवारी सांगितले की ते भारतामध्ये 1,000 अभियंते नियुक्त करणार आहेत. कंपनीने सांगितले की, भारतातील त्यांच्या R&D संस्थांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी आयआयटी (IIT) आणि उच्च अभियांत्रिकी संस्थांमधून सुमारे 1,000 अभियंते कामावर घेणार आहेत.
नवीन कर्मचारी पुढील वर्षी मुख्यत्वे संशोधन आणि विकास क्षेत्रात Samsung R&D Institute Bangalore, Samsung R&D Institute Noida, Samsung R&D Institute Delhi आणि Samsung Semiconductor India Research in Bengaluru मध्ये आपले काम सुरु करतील. नवीन कर्मचारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, इमेज प्रोसेसिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), कनेक्टिव्हिटी, क्लाउड, बिग डेटा, बिझनेस इंटेलिजन्स, प्रेडिक्टिव अॅनालिसिस, सिस्टम-ऑन-ए-चिप (SoC) सारख्या नव्या युगातील तंत्रज्ञानावर काम करतील.
सॅमसंग इंडियाचे एचआर प्रमुख समीर वाधवन म्हणाले, ‘सॅमसंगच्या संशोधन आणि विकास केंद्रांचे उद्दिष्ट भारतातील उच्च अभियांत्रिकी संस्थांमधून नवीन प्रतिभेची नियुक्ती करणे आहे, जे भारत-केंद्रित नवकल्पनांसह लोकांचे जीवन समृद्ध करणाऱ्या नवकल्पना, तंत्रज्ञान, उत्पादने आणि डिझाइन्सवर काम करतील. यामुळे डिजिटल इंडियाला सशक्त बनवण्याच्या आमच्या ध्येयाला मदत होईल.’ (हेही वाचा: Amazon आपला फूड डिलिव्हरी व्यवसाय बंद करणार; 29 डिसेंबरपासून मिळणार नाही सेवा)
सॅमसंग संगणक विज्ञान आणि संबंधित शाखा, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, एम्बेडेड सिस्टम आणि कम्युनिकेशन नेटवर्क यासारख्या विविध क्षेत्रातील अभियंत्यांची भरती करेल. या व्यतिरिक्त, कंपनी गणित आणि संगणन आणि सॉफ्टवेअर अभियांत्रिकी सारख्या स्ट्रीममध्येही भरती करणार आहे. या भरतीच्या हंगामात, सॅमसंगचे संशोधन आणि विकास केंद्र देशातील शीर्ष आयआयटीमधून सुमारे 200 अभियंते नियुक्त करेल. त्यांनी आयआयटी आणि इतर उच्च संस्थांमधील विद्यार्थ्यांना 400 हून अधिक प्री-प्लेसमेंट ऑफर देखील दिल्या आहेत.