Deepak Kesarkar | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्रामध्ये नव्या शैक्षणिक धोरणाची (New Education Policy) अंमलबजावणी येत्या जूनपासून होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे. यापुढे तांत्रिक शिक्षण देखील मराठीत दिलं जाणार असल्याचं त्यांनी आज (10 एप्रिल) माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. राज्यात आता यापुढे इंजिनियरिंग (Engineering), मेडिकलचे (Medical) शिक्षण मराठीत दिले जाणार असल्यामुळे याचा फायदा मराठी माध्यमामध्ये शिकणाऱ्या मुलांना होणार आहे. केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतात ही क्रांती घडत आहे. या क्रांतीचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. नक्की वाचा: Engineering Education in Marathi: 'इंजिनिअरिंगचे शिक्षण मराठीमधून दिल्यास अशा मुलांना पुढे कोणीही रोजगार देणार नाही'- Ajit Pawar.

मोदी सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. देशात 34 वर्षांनंतर नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. महाराष्ट्रातही ते आगामी वर्षापासून लागू केलं जाणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्याच्या मानस आहे. यामध्ये मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध करण्याचादेखील ऐच्छिक पर्याय असणार आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समन्वय, नियंत्रण आणि मार्गदर्शनासाठी सरकारने 11 सदस्यीय आंतरविभागीय समिती स्थापन केली होती. या समितीचे अध्यक्ष शालेय शिक्षणाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. विविध विभागातील अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

नव्या पॅटर्ननुसार, बोर्डाच्या परीक्षेचं महत्त्व कमी करण्याचा मानस आहे. त्याऐवजी सेमिस्टर पॅटर्नमध्ये परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. सध्या 10वी, 12वी ची बोर्ड परीक्षा वर्षातून एकदा होते. परंतु यापुढे वर्षातून दोन वेळा सेमिस्टर पॅटर्ननुसार बोर्ड परीक्षा घेतली जाऊ शकते. म्हणजेच नववीपासून बारावीपर्यंतचं शिक्षण आठ सेमिस्टर विभागले जाईल आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचा विचार आहे. पदवीसाठी देखील कला आणि विज्ञान शाखेत भेद न राखता विषय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळेल.