Mumbai: 17 मार्चपासून 50 टक्के Rotational Attendance नियम बंद करण्याचा BMC शिक्षण विभागाचा आदेश; Work From Home द्वारे चालतील वर्ग
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Wikimedia Commons)

याआधी राज्यात कोरोना विषाणूचे (Coronavirus) प्रमाण घटल्याने मिशन बिगीन अंतर्गत सरकारने अनेक गोष्टी सुरु केल्या होत्या. त्यावेळी शाळांमध्ये 50 टक्के शिक्षकांना रोटेशनल हजेरी लावावी लागेल असेही सांगण्यात आले होते. शिक्षकांनी हा नियम पळून शाळेत जाणेही सुरु केले होते. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवरील बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) शिक्षण विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. 17 मार्चपासून 50 टक्के रोटेशनल हजेरी नियम बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे. ‘बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना 17 मार्चपासून 50 रोटेशनल हजेरी नियम बंद करण्यास सांगण्याचे आदेश जारी केले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत शिक्षक ई-लर्निंग प्लॅटफॉर्मच्या मदतीने 'वर्क फ्रॉम होम' पॅटर्नद्वारे त्यांचे घेतील.’ कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता सरकारकडून पुन्हा एकदा काही निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत, तर काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत.

त्यानुसार सर्व प्रकारची सिनेमागृह, उपहारगृह, हॉटेल 50 टक्के कार्यक्षमतेने सुरु राहतील. 50 हून अधिक पाहुण्यांची उपस्थिती लग्नकार्यांसाठी नसावी. अंत्यसंस्कारांसाठी 20 जणांचीच उपस्थिती असावी. आरोग्य आणि अत्यावश्यक सेवांना वगळता सर्व कार्यालयांमध्ये फक्त 50 टक्के उपस्थितीच अपेक्षित आहे. वर्क फ्रॉम होम या पर्यायाला कार्यालयांनी प्राधान्य द्यावे, असे काही महत्वाचे नियम लागू करण्यात आले आहेत. (हेही वाचा: 15 मार्च ते 30 मार्च 2021 या कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत विशेष मोहीम; 6 महिन्यांवरील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना)

दरम्यान, मुंबईमध्ये आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1922 जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. मागील 24 तासात 1236 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात एकूण सक्रिय रुग्णसंख्या 15,263 इतकी आहे.