
कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. आता हळूहळू राज्यातील आयुष्य सामान्य होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. आता सरकारने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये (Maharashtra Colleges and Universities) 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील. महाराष्ट्र सरकारकडून बुधवारी, 50 टक्के विद्यार्थ्यांसह महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासह महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले की, चालू शैक्षणिक वर्षासाठी 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करणारा नियमही सरकारने माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महाविद्यालये मार्च 2020 पासून बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर 1 फेब्रुवारी 2021 रोजी सर्व कुलगुरुंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून विद्यापीठातील अभ्यासक्रम, परीक्षेचे नियोजन, वसतिगृह यासंदर्भात मानक कार्यप्रणाली (SOP) विद्यापीठांनी तयार करावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या. आता 50 टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठे पुन्हा सुरू करण्यासाठी सरकार लवकरच ‘एसओपी’ची यादी जारी करणार आहे.
महाराष्ट्र सरकारने मुंबई वगळता इतर सर्व शहरांत पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. 1 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात शाळा सुरू झाल्या आहेत. पुणे महानगरपालिकेने 1 फेब्रुवारीपासून 5 वी ते 8 वी पर्यंत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. (हेही वाचा: राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा; ऑनलाईन उपस्थिती ग्राह्य धरून मिळणार शिष्यवृत्ती, मंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश)
कोविड-19 च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेऊन, विद्यापीठे व महाविद्यालये सुरु करावीत. नियमित वर्ग घेण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. संबंधित विद्यापीठांनी स्थानिक प्राधिकरणांची सहमती घेऊन महाविद्यालये सुरु करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महाविद्यालये सुरु करताना कोविड-19 बाबत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे. वसतिगृह टप्प्याटप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करुन वसतिगृहाचे इलेक्ट्रिक व सेफ्टी ऑडिट करुन घेण्यात यावे, असेही विद्यापीठांना सूचित करण्यात आले आहे.