महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा (Maharashtra Board HSC Exam) आज (21 फेब्रुवारी) पासून सुरू होत आहे. यंदा बारावीच्या परीक्षेला राज्यात सुमारे 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थी सामोरे जाणार आहेत. शिक्षण आणि करियरच्या दृष्टीने 12वीची बोर्ड परीक्षा हा टर्निंग पॉईंट असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे. उच्च शिक्षण, परदेशी शिक्षणासाठी 12वीच्या परीक्षेमधील मार्क्स हे महत्त्वाची भूमिका बजावतात त्यामुळे बारावीच्या परीक्षेला सामोरं जाताना विद्यार्थी, पालक, शिक्षक विशेष लक्ष देऊन अभ्यास करतात. MHT CET 2024 Exam Schedule: महाराष्ट्र सीईटी परीक्षेचं वेळापत्रक जारी; mahacet.org वर पहा तारखा .
दरम्यान राज्यात बारावीच्या परीक्षा भयमुक्त आणि कॉपी मुक्त वातावरणामध्ये पार पडाव्यात यासाठी राज्य शिक्षण मंडळाने विशेष खबरदारी घेतली आहे. कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी सध्या राज्यात 271 भरारी पथकं नेमण्यात आली आहे. आज 21 फेब्रुवारी पासून सुरू होणारी ही परीक्षा 19 मार्च 2024 पर्यंत होणार आहे. कॉपी आणि पेपर फूटीचे प्रकार टाळण्यासाठी यंदाही विद्यार्थ्यांना अधिकची दहा मिनिटं ही उत्तरार्धात वाढवून देण्यात आली आहे. सकाळच्या सत्रामध्ये परीक्षा 11 ते 2.10 आणि दुपारच्या सत्रात परीक्षा 3 ते 5.10 अशा पार पडणार आहेत. नक्की वाचा: Maharashtra SSC, HSC Exam 2024 Dates: राज्यातील दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या तारखा .
विद्यार्थ्यांना परीक्षेला जाताना त्यांचं हॉल तिकीट सोबत ठेवणं बंधनकारक आहे. परीक्षेच्या आधी किमान अर्धा तास त्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक उपकरणांचा, मोबाईल फोनचा वापर निषिद्ध असणार आहे. राज्यातील नऊ विभागांच्या मंडळांमध्ये इयत्ता बारावीसाठी एकूण 3320 केंद्र आहेत. या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून विज्ञान शाखा: 7, 60, 046, कला शाखा: 3,81, 982, वाणिज्य शाखा 3, 29, 905, वोकेशनल कोर्स 37, 226, आय टी आय: 4750 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
शिक्षकांचं आंदोलन
एकीकडे बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत तर दुसरीकडे बारावी उत्तरपत्रिका तपासणार नाही, अशी भूमिका घेत विविध मागण्यांकरिता राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे. वेतनवाढ, पेन्शन, पदभरती अशा विविध मागण्यांकरिता राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनं करूनही केवळ आश्वासनापलीकडे काही मिळत नसल्याने, आता कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यार बहिष्कार टाकला आहे.