Ramesh Pokhriyal Nishank | (Photo Credits: Facebook)

इंजिनीअरिंगच्या यूजी कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा, संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Main) बाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ.रमेश पोखरियाल निशंक (Education Minister, Dr Ramesh Pokhariyal Nishank) यांनी ट्वीटद्वारे या संदर्भात माहिती दिली आहे. नवीन शिक्षण धोरण 2020 (NEP) अंतर्गत संयुक्त प्रवेश मंडळाने (JAB) निर्णय घेतला आहे की, आता जेईई मेन परीक्षा प्रादेशिक भाषांमधून (Regional Languages) देता येणार आहे. रमेश पोखरियाल निशांक यांनी दुसर्‍या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, 'ही परीक्षा अशा राज्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येतील, जिथे राज्य अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेच्या आधारे दिले जातात.

अशा राज्यांच्या भाषांमध्ये आता जेईई मुख्य परीक्षेत समावेश केला जातील. सध्या जेईई मेन परीक्षा हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषांमध्ये आयोजित केल्या जातात. तर एकूण 11 भाषांमध्ये NEET आयोजित केले गेले आहे. जेईई मेनमध्ये अन्य भाषांचा समावेश झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा आणि प्रवेश सुकर होणार आहे. विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार प्रश्नपत्रिकेची भाषा निवडण्यास सक्षम असतील. पुढच्यावर्षी पासून या नियम लागू केला जाईल.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना जेईई मुख्य परीक्षेत अधिक गुण मिळविण्यात मदत होईल. शिक्षणमंत्री म्हणाले, ‘अधिक प्रादेशिक भाषांमध्ये जेईई परीक्षा घेण्यात आल्यामुळे सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढेल आणि भाषेच्या अडचणीमुळे चांगले गुण मिळविण्यास अडचण येणारी विद्यार्थी आता त्यांचा स्कोअर वाढवू शकतील. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निदर्शनास आणून दिले होते की, PISA परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या देशांनी मार्गदर्शक तत्वांमध्ये मातृभाषा ठेवल्या आहेत. त्यामुळे आता या निर्णयाने जेईई मेन संबंधित दूरगामी परिणाम होतील.

दरम्यान, जेईई परीक्षेसंदर्भातील मागील अपडेटनुसार, संयुक्त प्रवेश मंडळाने, कोरोना व्हायरसमुळे JEE Advanced 2020 ची परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा IIT JEE 2021 परीक्षेसाठी परवानगी दिली होती.