कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीच्या काळात बर्याच लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. अनेकांना अजूनही नव्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत, तर काहींना वेतन कपातीचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत भारतीयांना टेक क्षेत्रात नोकरी मिळवण्याची मोठी संधी आली आहे. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी जेपी मॉर्गन (JP Morgan)यावर्षी भारतात हजारो लोकांना रोजगार देण्याची योजना आखत आहे. यावर्षी भारतात सुमारे 4,000 अनुभवी तंत्रज्ञांना आपल्यासोबत घेण्याची इच्छा असल्याचे जेपी मॉर्गनने सांगितले आहे. सध्या जेपी मॉर्गनमध्ये, बेंगळुरू, मुंबई आणि हैदराबादमध्ये तंत्रज्ञान आणि ऑपरेशनमध्ये 35,000 हून अधिक कर्मचारी आहेत. ही केंद्रे इन्व्हेस्टमेंट बँकेच्या ग्लोबल ऑपरेशन्सना सपोर्ट करतात.
जेपी मॉर्गन येथील एचआर इंडिया कॉर्पोरेट सेंटरचे प्रमुख गौरव अहलुवालिया म्हणाले, तंत्रज्ञान हे आमच्या ग्राहकांच्या यशासाठी आणि व्यवसायातील धोरणासाठी महत्वपूर्ण आहे. यामध्ये क्लाऊड, बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सायबर स्पेस यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. अशा गोष्टींना सपोर्ट करण्यासाठी आम्ही नेहमीच आमचे टॅलेंट ग्रो करण्याचा प्रयत्न करीत असतो. जेपी मॉर्गनचे जगभरात अडीच लाखांहून अधिक कर्मचारी आहेत आणि त्यातील 35,000 पेक्षा जास्त कर्मचारी भारतात कार्यरत आहेत. (हेही वाचा: आयटी कंपनी Cognizant ची मोठी घोषणा; 2021 मध्ये देणार तब्बल 28,000 फ्रेशर्सना नोकरी)
आता कंपनी अजून 4 हजार लोकांना नोकऱ्या देत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की या बहुतेक नोकऱ्या बेंगळुरूमधील टेक सेंटरवर होतील. दरम्यान, जेपी मॉर्गनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डिमन यांनी सांगितले की, यूएस-भारत फ्रेंडशिप अलायन्ससह कोविड मदतकार्यांना पाठिंबा देण्यासाठी बॅंकेने 2 दशलक्ष डॉलर्सची मदत करण्याचे वचन दिले आहे.