केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) सप्टेंबरमध्ये दहावी-बारावी साठीच्या कंपार्टमेंट परीक्षेच्या (Compartment Exams) तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसई बोर्डाच्या 10 आणि 12 च्या कंपार्टमेंट परीक्षा 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान घेण्यात येतील. आज मंडळाने म्हटले आहे की, कोरोना विषाणू (Coronavirus) साथीच्या दरम्यान परीक्षार्थी हँड सॅनिटायझर्सचा वापर करतील आणि फेस मास्क परिधान करतील. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, सर्व उमेदवार आपापले सॅनिटायझर्स पारदर्शक बाटल्यांमध्ये भरून व स्वत: च्या पाण्याच्या बाटल्या घेऊन येतील. सीबीएसई परीक्षा नियंत्रक सन्याम भारद्वाज यांनी परीक्षेच्या वेळापत्रकाच्या अधिकृत निवेदनात याबाबत माहिती दिली.
याआधी सीबीएसईने, 12 वीच्या कंपार्टमेंट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयात निषेध व्यक्त केला. कोरोना व्हायरसच्या साथीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व 'सुरक्षा उपाययोजना' घेण्यात येत आहेत असे त्यांनी नमूद केले. वाढत्या कोरोना व्हायरसच्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा देणे हे परीक्षार्थींच्या आरोग्यास हानिकारक असल्याचे सांगत, सीबीएसईने 12 वीसाठी परीक्षा घेण्याच्या निर्णयाला याचिकेत आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालय 10 सप्टेंबर रोजी या खटल्याची सुनावणी करेल.
यापूर्वी सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते की, कंपार्टमेंट परीक्षेची सुविधा केवळ त्याच विद्यार्थ्यांना आहे जे मुल्यांकन योजनेंतर्गत जाहीर झालेल्या निकालात नापास झाले आहेत किंवा आपल्या रिझल्टबद्दल खुश नाहीत. कोरोना मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन कंपार्टमेंट्स परीक्षा घेतल्या जातील, अशी माहितीही सीबीएसईने दिली. बोर्डाकडून सांगण्यात आले होते की, जर कंपार्टमेंट परीक्षा घेतल्या नाहीत तर याचा परिणाम बर्याच विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होतो. कोरोना साथीचा रोग लक्षात घेऊन रद्द करण्यात आलेल्या बोर्ड परीक्षेचा निकाल, पर्यायी मूल्यांकन योजनेच्या आधारे जुलैमध्ये जाहीर करण्यात आला.