महाराष्ट्रातील 1,800 तरुणांना मिळणार Digital Marketing आणि Artificial Intelligence चे प्रशिक्षण; केले जाणार नोकरीसाठी प्रयत्न, जाणून घ्या कुठे कराल नोंदणी
Nawab Malik (Photo Credits: Twitter)

राज्य सरकार एका नव्या प्रयत्नाने महाराष्ट्रातील तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि फ्यूएल या स्वयंसेवी संस्थेमार्फत राज्यातील 1,800 तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि डिजिटल मार्केटिंगचे (Digital Marketing) ट्रेनिंग आणि करिअर समुपदेशन देऊन त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते मंत्रालयात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. एचडीएफसी बँकेने महाराष्ट्रातील तरुणांसाठी फ्यूचर स्किल्स इनिशिएटिव्ह हा उपक्रम सुरू केला आहे. बँकेच्या सीएसआर निधीमधून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी फ्यूएल (फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जाझींग लाइव्ह्ज) ही स्वयंसेवी संस्था विद्यार्थ्यांना करिअर समुपदेशन, प्रशिक्षण आणि जॉब प्लेसमेंटसाठी मार्गदर्शन करणार आहे.

या उपक्रमाद्वारे एचडीएफसी बँक महाराष्ट्रातील 1, 800 पेक्षा जास्त तरुणांना करिअरविषयक सल्ला व कौशल्य प्रशिक्षण देईल. शिवाय या तरुणांना प्रशिक्षणानंतर आयटी/आयटीईएस क्षेत्रात रोजगाराच्या संधी शोधण्यास मदत करेल. प्रशिक्षणासाठी पात्र तरुण http://bit.ly/maharashtraregistration येथे नोंदणी आणि अर्ज करू शकतात. हे प्रशिक्षण एकूण सुमारे 200 तासांचे असेल. प्रशिक्षण पुणे येथे ऑफलाईन पद्धतीने तर इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने होईल.

यावेळी कौशल्य विकास मंत्री श्री. मलिक यावेळी म्हणाले की, एचडीएफसी बँक आणि फ्यूएल या स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तरुणांना फक्त कौशल्य प्रशिक्षण देऊन चालणार नाही, तर त्यानंतर त्यांना रोजगारही मिळणे आवश्यक आहे. मागील वर्षी कोरोनाचे संकट असतानाही रोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टल यासह विभागाच्या विविध उपक्रमांमधून राज्यात 1 लाख 99 हजार बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले आहे. यापुढील काळातही असे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील. (हेही वाचा: नोकरीसाठी प्रथमच CV तयार करत असाल तर 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा)

एचडीएफसी बँकेच्या सीएसआर प्रकल्प प्रमुख नुसरत पठाण म्हणाल्या की, एक सामाजिक जबाबदार कॉर्पोरेट संस्था म्हणून राज्यातील तरुणांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन अधिकाधिक तरुणांना नोकरीस तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.