फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण पाहता सर्वोच्च न्यायालयाने फक्त 2 तासच फटाके फोडण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदे (सीएसआयआर) या केंद्र सरकारच्या संस्थेने कमी प्रदुषण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती केली आहे. हे फटके फक्त पर्यावरणपूरकच नाहीत, तर इतर फटाक्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्तदेखील आहेत. अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी एका परिषदेमध्ये दिली.
सीएसआयआरने निर्मिती केलेल्या फटक्यांना सेफ वॉटर रिलीजर, सेफ मिनिमल अॅल्युमिनिअम, सेफ थर्माइट क्रॅकर अशी भन्नाट नावे देण्यात आली आहेत. पारंपरिक पद्धतीने फटाके बनवण्यासाठी अॅल्युमिनियम, पोटॅशियम नायट्रेट, सल्फर यांसारख्या रसायनांचा वापर केला जातो. परंतु ग्रीन क्रॅकर्स बनवताना या रसायनांचा वापर करण्यात आलेला नाही. फटाक्यांच्या स्पेशल वैशिष्ट्यांमुळे हे फटाके पेटवल्यानंतर त्यातून पाण्याच्या वाफा बाहेर येतात, यामुळे हवेतील धूर थोपवला जातो. तसेच फटाक्यातून निर्माण होणारा धूर या पाण्यात विरघळून जातो.
या सर्व फटाक्यांचा आवाज पारंपारिक फटाक्यांइतकाच येतो. त्याची आवाजाची क्षमता 105 ते 110 डेसिबल आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने या फटाक्यांची चाचणी पेट्रोलिअम अॅण्ड एक्सप्लोजिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनकडून (पेस्को) करण्यात आली आहे.
भारतात प्रत्येकवर्षी जवळजवळ 6000 करोड रुपयांची उलाढाल होते. देशातल्या तब्बल 5 लाख कुटुंबांना या फटक्यांमुळे व्यवसाय प्राप्त होतो. मात्र अशा प्रकारचे पर्यावरणपूरक फटाके निर्माण करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, प्रदूषणाला आळा बसवणे आणि जे लोक या व्यवसायात आहेत त्यांचे आरोग्य वाचवणे हे होय, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.