LPG Cylinder (PC - Latestly File Image)

LPG Price Cut: नवीन वर्ष 2025 ची सुरुवात एका दिलासादायक बातमीने झाली आहे. तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 रोजी 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial LPG Price) किमती कमी केल्या आहेत. तथापि, घरगुती एलपीजी 14 किलो सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने जारी केलेल्या नवीन किमतींनुसार, 19 किलोचा व्यावसायिक LPG सिलेंडर आता दिल्लीत 1804 रुपयांना उपलब्ध आहे. जो पूर्वी 1818.50 रुपये होता. त्याचप्रमाणे, इतर शहरांमध्ये देखील किमती कमी झाल्या आहेत. (New Year 2025: मोठ्या उत्साहात आणि आनंदात नव वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची मंदीरांमध्ये गर्दी (Watch Videos))

कोलकाता: 1927 रुपयांवरून 1911 रुपयांपर्यंत घसरले (16 रुपयांची कपात).

मुंबई: रु. 1771 वरून 1756 पर्यंत घसरले (15 रु. कपात).

चेन्नई: रु. 1980.50 वरून 1966 पर्यंत घसरले (रु. 14.50 ची कपात).

डिसेंबरमध्ये दरात वाढ झाली

यापूर्वी 1 डिसेंबर 2024 रोजी 19 किलो सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. त्याची किंमत दिल्लीमध्ये 1818.50 रुपये, कोलकात्यात 1927 रुपये, मुंबईमध्ये 1771 रुपये आणि चेन्नईमध्ये 1980.50 रुपये झाली आहे.

घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर स्थिर

14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बऱ्याच काळापासून कोणताही बदल झालेला नाही. 1 ऑगस्ट 2024 पासून ते स्थिर आहे.

दिल्ली: 803 रु.

कोलकाता: 829 रु.

मुंबई: 802.50 रु.

चेन्नई: 818.50रु.

व्यापाऱ्यांना दिलासा

19 किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीतील कपातीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर घरगुती ग्राहकांना कोणत्याही बदलाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

सहा महिन्यांनंतर दिलासा

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत सहा महिन्यांनंतर दिलासा मिळाला आहे. डिसेंबर 2024 मध्ये त्याची किंमत 16 रुपयांनी वाढवण्यात आली होती. तर नोव्हेंबरमध्ये सिलिंडरच्या किमती 62 रुपयांनी वाढल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीही सातत्याने वाढल्या आहेत.

ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 48.50 रुपयांनी वाढून 1,740 रुपये झाली. त्याआधी, सप्टेंबरमध्ये किंमत 39 रुपयांनी वाढवून 1,691.50 रुपये झाली. तर ऑगस्टमध्येही किंमत 8.50 रुपयांनी वाढली.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीचा थेट परिणाम रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यवसायावर होणार आहे. या बातमीमुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यवसायीकांना नवीन वर्षात दिलासा मिळाला आहे. मात्र, या सवलतीचा परिणाम ग्राहकांपर्यंत पोहोचेल की नाही, याबाबत साशंकता आहे.