
एकीकडे देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे सरकार हतबल झाले आहे. लोकसंख्या नियंत्रणात राहावी म्हणून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. तर दुसरीकडे लोकसंख्यावाढीला पाठींबा देणारे एक पाऊल आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी उचलले आहे. नुकतीच चंद्राबाबू यांनी घोषणा केली आहे की, राज्यात दोन पेक्षा अधिक अपत्यांना जन्म दिल्यास त्यांना शासनाकडून इंसेंटिव्ह दिला जाईल. याचसोबत नायडू यांनी, दोनहून अधिक अपत्यांना जन्म देणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविण्यास मज्जाव करणारा नियम देखील संपुष्टात आणला आहे.
ही घोषणा करून नायडू यांनी परिवार नियोजन नियमांचे उल्लंघन केले आहे. मात्र या घोषणेमागील उद्देश आणि कारण त्यांनी सांगितले, त्यांच्यामते ‘गेल्या दहा वर्षांत आंध्र प्रदेशच्या लोकसंख्येमध्ये कमालीची घट झाली आहे. मागील 10 वर्षांत 1.6 टक्क्यांनी लोकसंख्या कमी झाली आहे. त्यांचामते 2014 मधील जन्मदर हा 1000 ला 37 टक्के इतके होता, 2018 मध्ये तो कमी होऊन 1000 ला 10.51 टक्के इतका झाला आहे. ‘अन्नासाठी जितकी तोंडे असतील तितकेच हात कामासाठीही असतील’ असे त्यांनी सांगितले.
मागील 25 वर्षांमध्ये राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 50 टक्के तरुणाईची लोकसंख्या वाढली आहे. राज्यात जितकी अधिक मुले असतील तितकेच राज्य अधिक तरुण ठरेल असे नायडू यांनी सांगितले. 2011 च्या जनगणनेनुसार आंध्रप्रदेशची लोकसंख्या 4.97 कोटी असून, लोकसंख्येच्या आधारावर आंध्रप्रदेशचा देशात 10 वा क्रमांक आहे. तेलंगणाची निर्मिती होण्यापूर्वी आंध्र प्रदेशची एकूण लोकसंख्या 8.46 कोटी होती.