Pulwama Terror Attack: शहीद जवानांचे पार्थिव मूळ गावांकडे रवाना; आज होणार अंत्यसंस्कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credit: PIB)

14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये भारतीय लष्करावर दहशतवादी हल्ला झाला. जैश - ए – मोहम्मद संघटनेने हा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तब्बल 44 जवान शहीद झाले. संपूर्ण देशाला सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. हा हल्ला इतका भयानक होता की शहीद जवानांचे छिन्नविछिन्न मृतदेहांची ओळख पटवणेही अवघड झाले होते. या मृतदेहांची ओळख पटवण्‌यासाठी अखेर आधार कार्ड, सुट्टीचा अर्ज काही वैयक्तिक वस्तूंच्या आधारे ओळख पटवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव देह त्यांच्या मूळ गावांकडे रवाना झाले आहेत. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

हा देशाच्या इतिहास सीआरपीएफ जवानांवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. शहीद झालेल्या जवानांमध्ये महाराष्ट्रातील दोन सुपुत्रांचा समावेश आहे. संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील चोरपांग्राचे नितीन राठोड या हल्ल्यात शहीद झाले आहेत. आज त्यांनाही मानवंदना देण्यात येऊन, अंत्यसंस्कार केले जातील. दोन्ही शहीद जवानांचं पार्थिव सकाळी 10 ते 11 या दरम्यान विशेष विमानाने औरंगाबाद विमानतळावर येईल. एक पार्थिव हेलिकॉप्टरद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे तर दुसरे पार्थिव रस्तामार्गे लोणार येथे जाईल. (हेही वाचा : खबरदारी घेतली नाही; दहशतवादी हल्ल्यापूर्वी गुप्तहेर विभागाने दिला होता हा इशारा)

दरम्यान पुलवाना हल्ल्याशी संबंध असल्याच्या संशयावरून अवंतिपुरा आणि आसपासच्या परिसरातील 7 जणांना ताब्यात घेतलं आहे. या हल्ल्याचा सूत्रधार एक पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण देश या मुद्द्यावरुन एकसंघ राहावा यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले होते.