Bird Flu Update: भारतात कोरोना महामारी दरम्यान 'बर्ड फ्लू'मुळे दहशत; 'या' राज्यात अलर्ट
बर्ड फ्लू | प्रतीकात्मक (Photo Credits: PTI)

Bird Flu Update: देशात कोरोना साथीच्या दरम्यान, बर्ड फ्लूचा प्रसार तीव्रतेने वाढू लागला आहे. आतापर्यंत भारताच्या सहा राज्यात बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. आतापर्यंत केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि गुजरातमध्ये बर्ड फ्लूची पुष्टी झाली आहे. कृती योजनेनुसार या सहा राज्यांना रोग नियंत्रित करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. याशिवाय इतरही अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी दिल्लीवरही बर्ड फ्लूचा धोका कायम आहे. पशुसंवर्धन विभागाचे डॉ. राकेश सिंह यांनी सांगितलं की, "आम्हाला द्वारका आणि मयूर विहार फेज -3 आणि पश्चिम दिल्लीतील हस्तसाळ गावातून कावळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे मृत्यू बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे झाले आहेत की, नाही याची अद्याप खात्री पटलेली नाही."

बर्ड फ्लू संदर्भात केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सूचनेनुसार, मयूर विहार फेज तीन च्या सेंट्रल पार्कमध्ये द्रुत प्रतिसाद पथक पाठविण्यात आले आहे. दरम्यान, बर्ड फ्लूचा वाढता धोका पाहता गेल्या काही आठवड्यांत पोल्ट्री मास विक्रीत लक्षणीय घट झाली असल्याचा दावा दिल्लीतील कुक्कुट मांस विकणार्‍या दुकानदारांनी केला आहे. (Bird Flu: एवियन फ्लू चा धोका! जाणून घ्या काय आहेत बर्ड फ्लूची लक्षणे, कारणे, उपचार आणि कशाप्रकारे करू शकाल बचाव)

दिल्ली:

बर्ड फ्लूमुळे दिल्लीत चिकनच्या किंमती घसरल्या आहेत. दिल्ली मीट ट्रेडर्स असोसिएशनचे सरचिटणीस इरशाद कुरेशी म्हणाले, बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याच्या अहवालानंतर कोंबडीची विक्री कमीत कमी 20 टक्क्यांनी खाली आली आहे. कोंबडीचे मांस 200 रुपये प्रतिकिलोवरुन 150 रुपयांपर्यंत खाली आले आहे.

पंजाब:

राज्य सरकारने इतर राज्यांमधून पोल्ट्री उत्पादनांच्या आयातीवर 15 जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. राज्य पशुसंवर्धन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, पंजाब सरकारने कुक्कुट मांसासह सजीव पक्ष्यांच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे.

मध्य प्रदेश:

इंदूर महानगरपालिका (आयएमसी) चे आरोग्य अधिकारी उत्तम यादव यांनी शुक्रवारी सांगितले की, "आम्ही शहरातील विविध भागात मांस-विक्रीची अनेक दुकाने बंद केली आहेत. त्याद्वारे सुमारे 450 कोंबड्यांना प्रोटोकॉलनुसार, जमिनीत पुरण्यात आले आहे."

राजस्थानः

राज्यात विविध ठिकाणी पक्ष्यांच्या मृत्यूच्या घटना सुरूचं आहेत. राज्यात बर्ड फ्लूमुळे ठार झालेल्या एकूण पक्ष्यांची संख्या 2,166 वर गेली आहे. राजधानी जयपूरसह 11 जिल्ह्यातील पक्ष्यांमध्ये एव्हीयन इन्फ्लूएन्झा एन 5 एन 8 विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे.

गुजरात:

जुनागड जिल्ह्यात दोन मृत पक्ष्यांच्या नमुन्यांमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाची पुष्टी झाली आहे. सरकारच्या प्रोटोकॉलनुसार राज्यात सर्व खबरदारी घेतली जात आहे.

हिमाचल प्रदेशः

मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी शुक्रवारी सांगितले की, बर्ड फ्लूचा सामना करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सतर्क आहे. पोग धरणाच्या आजूबाजूच्या भागावर आतापर्यंत 3,400 पेक्षा जास्त पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यावर नजर ठेवली जात आहे. मृत पक्ष्यांना संपूर्ण प्रोटोकॉलसह जमिनीत पुरले जात आहे, जेणेकरुन संसर्ग होण्याचा धोका वाढणार नाही.

केरळ:

राज्यातील दोन जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी केंद्रीय पथक गुरुवारी दाखल झाले आहे. राज्यात आतापर्यंत हजारो कोंबड्या आणि बदकांचा मृत्यू झाला आहे.

कर्नाटक:

केरळ शेजारील कर्नाटकात सहा कावळे मृतावस्थेत सापडले आहेत. आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी गुरुवारी सांगितले की, पक्ष्यांचे मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. केरळच्या सीमेला लागून असलेल्या सर्व जिल्ह्यांत आवश्यक खबरदारीची पावले उचलली जात आहेत.

महाराष्ट्र:

बर्ड फ्लूच्या अनेक रुग्णांच्या पुष्टीनंतर सरकारने प्रशासनाला सतर्क केले आहे. तथापि, राज्याला कोणताही निकटचा धोका नसल्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.