Atishi Marlena: आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी मार्लेना (Atishi Marlena) यांनी आज 21 सप्टेंबर रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. सुषमा स्वराज, शीला दीक्षित यांच्यानंतर त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. मुख्यमंत्री होताच अतिशी यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal )यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून निवडणून देण्याची विनंती केली. (हेही वाचा: Atishi Takes Oath as CM of Delhi: आतिशी मार्लेना यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ; बनल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री (Watch Videos))
आतिशी यांच्यासोबत इम्रान हुसेन, गोपाल राय, सौरभ भारद्वाज आणि कैलाश गहलोत या आप नेत्यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली. दिल्लीतील राज निवास येथे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी आतिशी यांना मुख्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान, अतिशी यांनी यावेळी त्यांच्या भावना व्यक्त करत 'अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या लोकांच्या सेवेसाठी इतकी मोठी जबाबदारी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.', असे म्हणाल्या. 'मी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे, तथापि, अरविंद केजरीवाल यांच्यामुळे आमच्यासाठी हा खूप भावनिक क्षण आहे. यापुढे ते मुख्यमंत्री नाहीत, ज्याने गेल्या 10 वर्षांत दिल्लीची प्रतिमा बदलली आहे.अरविंद केजरीवाल यांना पुन्हा दिल्लीचे मुख्यमंत्री बनवणे हे एकमेव काम आता आपल्याला करायचे आहे.' असे अतिशी म्हणाल्या.
पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. यावेळी दिल्लीच्या जनतेला एक गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे अरविंद केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवायचे आहे. दिल्लीतील नागरिकांनी अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री बनवले नाही, तर भाजप मोफत विजेचे सुविधा देणे बंद करेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.