PM Modi (फोटो सौजन्य - ANI)

Delhi Election Results 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Election)  भाजपने सुमारे 27 वर्षांनी मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत दिल्लीकरांनी आम आदमी (AAP) पक्षाला नाकारलं असून पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दिल्लीतील भाजपच्या या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modei) भाजप मुख्यालयात (BJP Headquarters) पोहोचले आहेत. जिथे त्यांनी आपल्या भाषणात या विजयाबद्दल पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी केजरीवाल सरकारवर जोरदार टीका केली. यावेली पंतप्रधान मोदींनी केजरीवालांसह दिल्ली सरकारवर निशाणा साधला. ज्यांना मालक असल्याचा अभिमान होता त्यांना दिल्लीने नाकारले, असं पंतप्रधानांनी केजरीवाल यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, आज दिल्लीतील लोकांमध्ये उत्साह आणि शांतता आहे. दिल्लीला 'आप'पासून मुक्त केल्याबद्दल विजयाचा उत्साह आणि समाधान आहे. मी दिल्लीतील प्रत्येक रहिवाशाला एक पत्र पाठवले होते. तुम्ही सर्वांनी हे पत्र प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवले आहे. मी दिल्लीला प्रार्थना केली होती की भाजपला 21 व्या शतकात सेवा करण्याची संधी द्यावी, भाजपला दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी बनवण्याची संधी द्यावी. मोदींच्या हमीवर विश्वास ठेवल्याबद्दल मी दिल्लीतील प्रत्येक कुटुंबाला नमन करतो, मी दिल्लीतील सर्व लोकांचे आभार मानतो. (हेही वाचा - Swati Maliwal's Reaction: 'महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना देव शिक्षा करतो'; 'आप'च्या पराभवनंतर स्वाती मालीवाल यांनी खास पोस्ट करत दिली प्रतिक्रिया)

विकास, दूरदृष्टी आणि विश्वासाचा विजय - पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांनी पुढे बोलताना सांगितलं की, दिल्लीने आपल्याला खुल्या मनाने प्रेम दिले आहे. मी पुन्हा एकदा दिल्लीच्या लोकांना आश्वासन देतो की तुमच्या या प्रेमाची परतफेड आम्ही विकासाच्या रूपात दीडपट करू. आजचा विजय ऐतिहासिक असल्याचेही त्यांनी सांगितले. दिल्लीच्या जनतेने आप-दा ला बाहेर काढले आहे. दिल्ली दशकभरापासून आप-दापासून मुक्त आहे. दिल्लीचा जनादेश स्पष्ट आहे. आज दिल्लीत विकास, दूरदृष्टी आणि विश्वासाचा विजय झाला आहे. आज दिल्लीवर कब्जा केलेला दिखाऊपणा, अराजकता, अहंकार आणि आप-दा यांचा पराभव झाला आहे. या निकालामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या दिवसरात्र मेहनतीचे सार्थक झाले आहे. ((हेही वाचा - Delhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणूकीत आपचा पराभव का झाला? कोणत्या प्रमुख कारणांमुळे दिल्लीकरांनी बदलला कौल? जाणून घ्या)

तथापी, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, आज या ऐतिहासिक क्षणी मी सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप एकामागून एक विजय मिळवत आहे. या निवडणुकीत आणि त्यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे. लोकसभेत तुम्ही भाजपला सर्व 7 जागांवर विजय मिळवून दिला. तसेच आता विधानसभा निवडणुकीत तुम्ही 48 जागांवर विजय मिळवून दिला. यासाठी सर्वांचे धन्यवाद.