Power Grid, Indian Railways (PC - Pixabay, File Image)

Power Crisis in India: देशभरात उष्णतेची लाट सुरू असतानाच उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांमध्ये कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, यूपीमध्ये वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 657 प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. औष्णिक वीज केंद्रांसाठी पुरवल्या जाणाऱ्या कोळशाने भरलेल्या मालगाड्यांना सहज मार्ग मिळावा आणि कोळसा वेळेवर पोहोचता यावा यासाठी या गाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्रासह देशातील 13 राज्यांना वीज संकटाचा सामना करावा लागत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे विजेची मागणी झपाट्याने वाढल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय कोळशाच्या टंचाईमुळे अनेक राज्यांमध्ये वीज संकट निर्माण झाले आहे. दुसरीकडे, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, झारखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानमधील लोकांनाही वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. (हेही वाचा - Weather Forecast: पाच राज्यांना यंदा उष्णतेच्या भयान झळा, देशातील अनेक ठिकाणी तापमान 45 डिग्रीवर पोहोचण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज)

देशातील वीज संकटावर केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, रशियाकडून होणारा गॅस पुरवठा बंद झाला आहे. तथापि, औष्णिक ऊर्जा केंद्रात 21 दशलक्ष टन कोळशाचा साठा आहे. जो दहा दिवस पुरेल. कोल इंडियासह, भारतात एकूण 3 दशलक्ष टनांचा साठा आहे. हा 70 ते 80 दिवसांचा साठा आहे. मात्र, सध्याची परिस्थिती स्थिर आहे.

सध्या दैनंदिन वापराच्या 2.5 अब्ज युनिट्सच्या तुलनेत सुमारे 3.5 अब्ज युनिट वीजनिर्मिती होते, असेही त्यांनी सांगितले. मात्र, शेवटच्या दिवसात उष्णतेसोबतच विजेची मागणीही वाढली आहे. आमच्याकडे 10-12 दिवसांचा कोळशाचा साठा आहे. मात्र, त्यानंतरही वीज प्रकल्प बंद होण्याची शक्यता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. NTPC ने सांगितले की, दादरीचे सर्व 6 युनिट आणि उंचाहारचे 5 युनिट पूर्ण क्षमतेने चालू आहेत. आम्हाला सतत कोळशाचा पुरवठा होत आहे. आमच्याकडे सध्या 140000 MT आणि 95000 MT कोळशाचा साठा आहे. आयात केलेला कोळसाही पाइपलाइनमध्ये आहे.

दरम्यान, कडाक्याची उष्णता हे वीज संकटामागील प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. केंद्रीय ऊर्जा मंत्री आर के सिंह यांनीही अनेक राज्यांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याची कबुली दिली होती. ते म्हणाले होते, रशिया-युक्रेन युद्धामुळे कोळशाच्या आयातीवर परिणाम झाला आहे. याशिवाय झारखंडमधील कोळसा कंपन्यांची थकबाकी न भरल्याने कोळसा संकट निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.