Temperature | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाच्या झळा काहीशा अधिकच आहेत. संपूर्ण भारताच्या तुलनेत प्रामुख्याने पाच राज्यांत यंदा उष्णता (Heat Wave) अधिक जाणवेल असे हवामान विभागाने म्हटले आहे. प्रामुख्याने राजस्थान, दिल्ली, हरियाणा, यूपी आणि ओडिशा राज्यात उन्हाचा तडाखा यंदा नेहमीपेक्षा अधिक जाणवेल. तर भारताच्या इतरही अनेक ठिकाणी पारा 45 डिग्री सेल्सियसच्याही वर जाईलअसा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. राजधानी दिल्लीत काल आणि आजही नेहमीच्या तुलनेत दोन ते तीन डिग्री सेल्सियस अंशाची वृद्धी पाहायला मिळाली. इतर राज्यांमध्येही उष्णतेची वाढ कायम आहे.

हवामान विभागाने उष्णतेबाबत अंदाज व्यक्त करत म्हटले आहे की, पुढच्या पाच दिवसांमध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये, प्रदेशात नागरिकांना अधिक उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. काही भागांमध्ये उष्णता 2 सेल्सियस अंशाने वाढलेली पाहायला मिळू शकते. दिलासादायक वृत्त असे की, तापमानात वाढ झाल्यानंतर 2 सेल्सियस अंश इतकी घटही पाहायला मिळू शकते. आगामी काळात राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशा सारख्या राज्यांमध्ये आगामी काळात अधिक उष्णता पाहायला मिळू शकते. दरम्यान, उष्णतेच्या काळात काहीसी पर्जन्यवृष्टीही पाहायला मिळू शकते. भारतीय हवामान विभागाचे संशोधक आर के जेनामणी यांच्या हव्याल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

मध्य प्रदेशमध्ये नागरिक उष्णतेमुळे सर्वाधिक हैराण आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पारा प्रचंड वाढला आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये तापमान 45 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे की, इथे सरासरी तापमान 43 अंश डिग्री पर्यंत पोहोचू शकते. राजस्थानमध्येही उष्णता वाढत असून, नागरिकांची वीजेची मागणी विचारात घेऊन तिथल्या सरकारने चार तासांसाठी औद्योगीक क्षेत्राची वीज कपात सुरु केली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान सोबतच, जम्मू-कश्मीर, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आदी राज्यांनाही उष्णतेचा फटका बसतो आहे. काही राज्यांनी वाढती उष्णता पाहता शाळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत.