Man dies after taking under trial medication प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Bengaluru Shocker: कर्नाटकची राजधानी बेंगळुरू (Bengaluru) मध्ये एका संशोधन आणि विकास कंपनीने (R and D Company) केलेल्या क्लिनिकल चाचणीत (Clinical Trial) सहभागी झालेला एक 33 वर्षीय तरुण जलहल्ली (Jalahalli) येथील त्याच्या भावाच्या घरी मृतावस्थेत आढळला. भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. भावाचा आरोप आहे की, त्याच्या भावाने एका संशोधन आणि विकास कंपनीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये भाग घेतला होता. या चाचणीत सहभागी झाल्यानंतरच त्यांची तब्येत बिघडली. भावाने मृत्यूसाठी क्लिनिकल चाचणीला जबाबदार धरले आहे.

तरुणाचा मृत्यू औषधांमुळे झाला का?

पोलिसांनी मृत तरुणाची ओळख नागेश वीरन्ना अशी केली आहे. 22 जानेवारी रोजी मृत तरुणाच्या भावाने पोलिसात तक्रार दाखल केली. नागेश त्याच्या भावाच्या जलाहल्ली येथील घरात मृतावस्थेत आढळला. भाऊ रेवन्ना सिद्धप्पा यांनी सांगितले की, क्लिनिकल चाचण्यांदरम्यान दिलेल्या अनेक औषधांच्या दुष्परिणामांमुळे त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Mukesh Ambani यांची Covid-19 लस निर्मिती क्षेत्रात उडी; Reliance Life Sciences च्या Vaccine ला क्लिनिकल ट्रायल्ससाठी मंजुरी)

प्रकरणाची चौकशी सुरू -

जलहल्ली पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, आम्ही भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 194 (3) अंतर्गत अनैसर्गिक मृत्यू म्हणून तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. भाऊ सिद्धप्पा यांच्या मते, त्यांचा भाऊ नागेश वीरण्णा यांना क्लिनिकल ट्रायलमध्ये भाग घेण्यापूर्वी कोणत्याही आरोग्य समस्या नव्हत्या. (हेही वाचा - Coronavirus: केरळमधील कोरोना व्हायरस रुग्णांवर सुरु होणार Zingivir-H या आयुर्वेदिक औषधाची क्लिनिकल चाचणी; CTRI ने दिली मान्यता)

मृताच्या भावाने पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, नागेश वीरण्णा यांना आरोग्याच्या समस्यांमुळे एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हा संशोधन आणि विकास कंपनीने त्यांच्याशी संपर्क साधला आणि चाचणीचा भाग म्हणून त्यांना गोळ्या आणि इंजेक्शन देण्याची ऑफर दिली. तक्रारीनुसार, 21 जानेवारीच्या रात्री दोन्ही भावांनी एकत्र जेवण केले. यानंतर दोघेही झोपी गेले. पण सकाळी जेव्हा भाऊ सिद्धप्पाने नागेशला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो उठला नाही.

दरम्यान, सिद्धप्पा यांनी ताबडतोब आर अँड डी कंपनीच्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर डॉक्टरांनी नागेशला त्याच रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले, जिथे त्याच्यावर आधी उपचार झाले होते. पण तिथे पोहोचताच डॉक्टरांनी नागेशला मृत घोषित केले.