Mukesh Ambani यांची Covid-19 लस निर्मिती क्षेत्रात उडी; Reliance Life Sciences च्या Vaccine ला क्लिनिकल ट्रायल्ससाठी मंजुरी
Mukesh Ambani (Photo Credits: IANS)

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मालकीच्या रिलायन्सने आता कोविड-19 लसीच्या (Covid-19 Vaccine) निर्मितीमध्ये पुढाकार घेतला आहे. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स लाइफ सायन्सेसद्वारे (Reliance Life Sciences) सध्या कोरोना विरोधी लस तयार केली जात आहे. या लसीला आता औषध नियंत्रकाकडून क्लिनिकल चाचणीसाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. ही दोन डोसची लस आहे. माहितीनुसार, क्लिनिकल ट्रायल्ससाठी मंजूर केलेली ही रिकॉम्बिनेंट प्रोटीन-आधारित लस आहे. एसईसीच्या बैठकीत रिलायन्स लाईफच्या अर्जाचे पुनरावलोकन झाले आणि त्यांना क्लिनिकल ट्रायलसाठी मंजुरी देण्यात आली.

इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार, रिलायन्सने त्याच्या प्रस्तावित लसीच्या फेज-1 च्या चाचणीसाठी औषध नियामकाशी संपर्क साधला होता. फेज 1 क्लिनिकल ट्रायल जास्तीत जास्त सहनशील डोस ठरवण्याच्या उद्देशाने लसीच्या सुरक्षा, सहनशीलता, फार्माकोकाइनेटिक्स आणि लसीच्या यंत्रणेविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते. तज्ञांच्या मते, सहनशील डोसची ताकद तपासण्यासाठी फेज-1 ची ट्रायल साधारणतः 58 दिवसांची असते. ती पूर्ण झाल्यावर फेज 2 आणि फेज 3 च्या चाचण्यांसाठी अर्ज केले जातात.

सध्या देशात सर्वात जास्त सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेच्या कोवॅक्सिनच्या लसीचा वापर केला जात आहे. त्याच वेळी, रशियाच्या स्पुतनिक व्ही, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायडस कॅडिला अशा लसींनाही भारतात आणीबाणीच्या वापरासाठी परवानगी मिळाली आहे. (हेही वाचा: Covishield च्या दोन लसींमधील अंतर कमी करण्याचा विचार, लवकरच मोठ्या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता)

दरम्यान, कोरोनाविरुद्धच्या लढाईत आज लसीकरणाचे मागील सर्व रेकॉर्ड मोडले गेले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत देशभरातील 90 लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. एका दिवसात जास्तीत जास्त लोकांना लस देण्याचा हा एक नवीन विक्रम आहे, यापूर्वी एका दिवसात 88 लाख लोकांना लस देण्याचा विक्रम झाला होता. शुक्रवारी देशभरात 90 लाख लोकांना लस मिळाल्यानंतर आता देशात लस घेणाऱ्यांची संख्या 62 कोटींच्या पुढे गेली आहे.