Liquor, Death Image (PC - Pixabay)

Sangrur Spurious Liquor Case: पंजाब (Panjab)मधील संगरूर (Sangrur) जिल्ह्यात विषारी दारू (Spurious Liquor) प्यायल्याने आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. संगरूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, इथेनॉलयुक्त मद्य प्राशन केल्यानंतर किमान 40 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवार, 20 मार्च रोजी, विषारी मद्य प्राशन केल्याने चार लोकांचा मृत्यू झाला. तसेच काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, पटियालाच्या राजिंद्र रुग्णालयात उपचारादरम्यान आणखी चार जणांचा मृत्यू झाला.

याव्यतिरिक्त, शुक्रवार 22 मार्च रोजी 8 लोकांचा मृत्यू झाला. तसेच शनिवारी 5 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 21 झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आणखी दोघांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा - Uttar Pradesh: अलीगड येथे विषारी दारू प्यायल्याने 22 जणांचा मृत्यू, 28 लोकांवर उपचार सुरु, अधिकारी निलंबित)

दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीत अटक केलेल्या आरोपींनी एका घरात विषारी दारू तयार होत असल्याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घरावर छापा टाकून 200 लिटर इथेनॉल हे विषारी रसायन जप्त केले. पोलिस उपमहानिरीक्षक हरचरणसिंग भुल्लर यांनी शुक्रवारी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, या घटनेत आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला असून आम्ही या प्रकरणात दोन नवीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू असून दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल. (वाचा - Bihar: बिहारमध्ये बनावट दारू पिल्याने सहा जणांचा मृत्यू)

दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी पंजाब सरकारने उच्चस्तरीय विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. पोलिसांनी 200 लिटर इथेनॉल आणि 156 दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. याशिवाय बनावट दारूच्या 130 बाटल्या, लेबल नसलेल्या बनावट दारूच्या 80 बाटल्या, 4,500 रिकाम्या बाटल्या तसेच बाटली बनवण्याचे मशीन जप्त करण्यात आले आहे.