Liquor (Photo Credits: PTI)

शुक्रवारी, अलिगड (Aligarh) जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या भागात अवैध देशी दारूचे (Spurious Liquor) सेवन करणाऱ्या 22 जणांचा मृत्यू झाला. सध्या 28 लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. यामध्ये असे सहा लोक आहेत, ज्यांचे मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाने पोलिस प्रशासनाला न कळविता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेनंतर राज्य सरकारने कडक पावले उचलली असून, जिल्हा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांसह पाच जणांना निलंबित केले. या प्रकरणात दारूच्या दुकानाच्या मालकासह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

अलिगड जिल्हाधिकारी चंद्रभूषण सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि ही चौकशी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी स्तरावरील अधिकारी करतील. ते पुढे म्हणाले की, चौकशीत दोषी आढळलेल्यांविरूद्ध प्रशासन राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लागू करू शकते. अतिरिक्त जिल्हाधिकारी (वित्त) विधान जयस्वाल म्हणाले की, जिल्हा प्रशासनाच्या तपासणीत असे निष्पन्न झाले आहे की दारूमुळे प्रभावित झालेले बहुतेक लोक लोढा, खैर आणि जांवा या तीन पोलीस स्टेशन परिसरातील आहेत.

अतिरिक्त मुख्य सचिव (उत्पादन शुल्क) संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, अलिगडचे जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी धीरज शर्मा, संबंधित क्षेत्रातील अधिकारी राजेश कुमार यादव आणि चंद्रप्रकाश यादव, प्रधान उत्पादन शुल्क हवालदार अशोक कुमार, उत्पादन शुल्क हवालदार रामराज राणा यांना त्वरित निलंबित करण्यात आले आहे आणि त्यांच्याविरुद्ध विभागीय कार्यवाही सुरू केली आहे. (हेही वाचा: चंद्रपूर मधील दारुबंदी उठविल्यानंतर चित्रा वाघ पुन्हा आक्रमक; जयंत पाटील यांचा जूना व्हिडिओ शेअर करत विचारला जाब)

या प्रकरणात, ज्या 5 दुकानांमधून दारू खरेदी झाली आहे त्यांना सील करून त्यांच्याकडील नमुने गोळा करून ते तपासणीसाठी पाठवले आहेत. पोलिस पथकाने जिल्ह्यातील दारू तस्करीच्या रॅकेटच्या तीन मुख्य आरोपींची ओळख पटवून चार जणांना अटक केली आहे, तर दोन मुख्य आरोपी फरार आहेत, ज्यांच्यावर एडीजीने प्रत्येकी 50,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 2021 मध्ये राज्यात विषारी दारूच्या घटनेची ही सहावी मोठी घटना आहे.