
बिग बॉस 13 (Bigg Boss 13) सध्या नक्कीच चर्चेचा विषय बनला आहे. सदस्यांची मारामारी, ड्रामा, हास्य, प्रेम आणि युक्तिवादांनी भरलेल्या भागांसह, हा ‘तेढा सीझन’ प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करीत आहे. सुरुवातीला थोडा ‘थंडा’ वाटलेल्या या सीझनने विशेषत: वाइल्ड कार्ड स्पर्धकांच्या एन्ट्रीनंतर वेग पकडण्यास सुरवात केली. आता हा शो ‘टॉप 10’ मध्ये सामील झाला आहे. अशात बिग बॉस 13 च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. शोला मिळत असलेला प्रतिसाद पाहता मेकर्स या शोचा कालावधी अजून वाढवू इच्छित आहेत. शोच्या फॉरमॅटनुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा शो संपणे अपेक्षित आहे, मात्र आता हा अजून 3-4 आठवडे वाढू शकतो, स्पॉटबॉयने याबाबत वृत्त दिले आहे.
बिग बॉस 12 फ्लॉप झाल्यावर यावर्षी 13 व्या सीझनमध्ये अनेक बदल करण्यात आले. आता हा सीझन लोकप्रिय ठरत आहे, त्यामुळे निर्माते हा 13 वा सीझन 3 ते 4 आठवडे वाढविण्याचा विचार करीत आहेत. असे झाल्यास शोचा फिनाले जानेवारी 2020 ऐवजी, फेब्रुवारीमध्ये असेल. गेल्या काही दिवसांपासून घरात सुरु असलेल्या ड्रामामुळे शोला चांगला टीआरपी मिळत आहेत. सिद्धार्थ आणि असीमच्या लढाईने यामध्ये अजूनच भर पडली. सर्वात महत्वाचे म्हणजे यावेळी सर्वच सदस्य तगडे आणि एकमेकांवर मात देणारे आहेत ज्याचा फायदा मेकर्सना होत आहे.
(हेही वाचा: Bigg Boss 13: बिग बॉस 13 चा विजेता म्हणून गुगलने केली असीम रियाझच्या नावाची घोषणा; शेहनझ गिल ठरली उत्तेजनार्थ)
बिग बॉस 13 चा कालावधी अजून वाढला तर, शोमध्ये नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्रीची शक्यता आहे. ही गोष्ट बिग बॉस चाहत्यांसाठी एखादी ट्रीट असणार आहे. असेही सांगितले जात आहे की, कलर्सने या गोष्टीवर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे, आता या गोष्टीची अधिकृत घोषणा होणेच फक्त बाकी आहे.