
Bigg Boss Marathi 2 Day 23 Episode: बिग बॉसच्या घरात आज नॉमिनेशन प्रक्रियेसाठी शेरास सव्वा शेर हा टास्क रंगला. या नॉमिनेशन प्रक्रियेत वैशाली माडे कॅप्टन असल्याने आणि हिनाची नुकतीच एन्ट्री झाल्याने या दोघी सेफ होत्या. तर शिव थेट नॉमिनेट झाल्याने त्याला या टास्कमध्ये सहभागी होता येणार नव्हते. या टास्कमध्ये 1-10 क्रमांकावर उभे राहत या क्रमांकावर उभे राहण्यासाठी आपण बिग बॉसच्या घरात काय कामगिरी केली याचे स्पष्टीकरण द्यायचे होते. या टास्कमध्ये पहिल्या क्रमांकावर अभिजीत केळकर तर दुसऱ्या क्रमांकावर किशोरी शहाणे उभ्या होत्या. मात्र 1-2 क्रमांकावरुन किशोरी शहाणे-अभिजीत केळकर यांच्यात वाद रंगला. पण तो हलका फुलका होता. खरा वाद रंगला तो 4 आणि 7 नंबरवर उभ्या असलेल्या स्पर्धकांमध्ये. ते म्हणजे अभिजीत बिचुकले आणि रुपाली भोसले. (बिग बॉसच्या घरात रुपाली भोसले आणि अभिजित बिचुकले यांच्यात 'शेरास सव्वा शेर' टास्क दरम्यान जोरदार वाद, कोण ठरणार वरचढ?)
रुपालीला 4 नंबर हवा असल्याने तिने बिचुकले 4 नंबरसाठी कसे अपात्र आहेत, याचा पाढा वाचायला सुरुवात केली. त्यांची घरातील कामगिरी, वागणूक यावर थेट टीका केली. त्यानंतर भडकलेल्या बिचुकलेंनी रुपालीला अपशब्द वापरत 4 नंबर सोडला आणि गेम सोडत असून बिग बॉसच्या घरातून बाहेर जात असल्याचे सांगितले. बिचुकले यांनी 4 नंबर सोडताच रुपाली त्या नंबरवर जावून उभी राहिली आणि बिचुकलेंच्या शिव्या, अपशब्दांकडे दुर्लक्ष करत त्यांना थॅक्स म्हणू लागली. बिचुकलेंनी मात्र संयम सोडल्याने आपला नंबर गमावला. मात्र येथे रुपालीने हवा तो नंबर मिळवण्यासाठी दाखवलेल्या चातुर्याचे कौतुक करायला हवे.
भडकलेल्या बिचुकलेंना हिना आणि कॅप्टन वैशालीने समजवल्यानंतर ते 10 व्या क्रमांकावर जावून उभे राहीले आणि आपल्या खास गाण्याच्या शैलीत त्याचे समर्थनही केले. मात्र त्यानंतर 6 व्या क्रमांकापासून 10 व्या क्रमांकापर्यंत उभे असलेले सर्व स्पर्धक नॉमिनेट झाले. यात वीणा जगताप, पराग कान्हेरे, विद्याधर जोशी, सुरेखा पुणेकर आणि अभिजीत बिचुकले ही नावे असून शिव यापूर्वी सर्वानुमते नॉमिनेट झाला आहे.