Jagesh Mukati Dies: अभिनेता जगेश मुकाटी यांचं निधन; मुंबईत रूग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास
जगेश मुकाती (Image Credit: Facebook)

मनोरंजनसृष्टीमधील अनेक हरहुन्नरी कलाकार मागील काही दिवसांपासून जगाचा निरोप घेत असल्याच्या बातम्या एकामागोमाग एक धडकत आहेत. यामध्ये आता 'अमिता का अमित' (Amita Ka Amit) फेम जगेश मुकाटी  (Jagesh Mukati) यांचं निधन झालं आहे. त्यांची सह कलाकार अभिनेत्री अंबिका रांजणकरने सोशल मीडियावर ही दु:खद बातमी शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. दरम्यान जगेश मुकाटी मागील काही दिवसांपासून आजारी होते. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

जगेश मुकाटी हे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या विनोदी मालिकेसोबतच ‘अमिता का अमित’, ‘श्रीगणेश’ यांसारख्या मालिका आणि ‘हसी तो फसी’, ‘मन’ या चित्रपटांमधून रसिकांच्या भेटीला आले होते. अनेक गुजराती मालिकांमध्येही त्यांनी काम केलं होतं. मात्र त्यांचं अकाली जाणं रसिकांच्या आणि कलाकारांच्याही मनाला चुटपूट लावणारं ठरलं आहे.

अभिनेत्री अंबिका रांजणकर यांची श्रद्धांजली

दयाळू, मदतीला धावून येणार, हजरजबाबी... फार लवकर निघून गेलास. तुझ्या आत्म्याला सदगती लाभो! अशी भावूक प्रतिक्रिया देत अंबिकाने आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान मागील काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधून इरफान खान, ऋषी कपूर, वाजिद खान या कलाकारांनी तर बासू चॅटर्जी सारख्या दिग्दर्शकाने जगाचा निरोप घेतल्याने सिनेसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली होती.