टीव्ही अभिनेता अंश अरोरा (Ansh Arora) याच्या कुटुंबाने गाझियाबाद पोलिसांच्या (Ghaziabad Police) विरुद्ध ‘थर्ड डिग्री टॉर्चर’ (Third Degree Torture) ची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी आपल्याला मारहाण केली, शिवीगाळ केला असा आरोप अंश याने केला आहे. सध्या अंशवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून, त्याच्या आई- वडिलांनी गाझियाबादच्या एसएसपीकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. ‘कसम तेरे प्यार की’ (Kasam Tere Pyaar Ki) या मालिकेत अंश काम करत असून, गाझियाबादच्या एका मॉलमध्ये झालेल्या वादानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. अंशने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अंश अरोरा गाझियाबादच्या मॉलमधील एका 24x7 खाण्याच्या दुकानात गेला होता. ऑर्डर देऊन एक तास झाला तरी पदार्थ मिळाले नाही म्हणून, त्याचे आणि तिथल्या कर्मचाऱ्याचे वाद झाले. त्यानंतर रागाच्या भरात अंशने दुकानाची तोड फोड करण्यास सुरुवात केली, त्याने तिथल्या संगणकावर आपला राग काढला. शांत झाल्यावर त्याने माफी मागितली, मात्र दुकानाच्या मालकाने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
अंशच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्याशी गैरवर्तन केले, त्याला बेदम मारहाण केली. त्याच्या भावालाही मारहाण करून कुटुंबाला शिवीगाळ केली. या प्रकारामुळे त्याच्या तब्येत खराब होऊन त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले. याबाबत मानवाधिकार आयोगालाही पत्र लिहून माहिती देण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहे, अंशने आधी मारहाण करायला सुरुवात केली असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या पोलिसांवर करण्यात आलेल्या आरोपांचीही चौकशी होत आहे.