Website for Sushant Singh Rajput (Photo Credits: Facebook)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) या बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकाराने वयाच्या 34 व्या वर्षी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. नैराश्याच्या फेर्‍यात अडकलेला हा उमदा कलाकार 14 जून दिवशी या जगातून अकाली निघून गेला. त्याच्या मृत्यूमुळे मनोरंजन सृष्टी, सामान्य व्यक्ती आणि त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. झगमगत्या मनोरंजन विश्वात यशाच्या शिखरावर पोहचलेला हा कलाकार इंजिनियर होता. त्याला वाचनाची,लिखाणाची प्रचंड आवड होती. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटसवर तो musings म्हणजे त्याचे विचार, सकारात्मक कोट्स शेअर करायचा. आता त्याच्या या विचारांचा खजिना त्याच्या कुटुंबियांनी https://selfmusing.com/ या वेबसाईट्सच्या माध्यमातून जगासमोर पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला आहे.

सुशांत सिंग राजपूत याच्या फेसबूक अकाऊंटवर त्याची माहिती देण्यात आली आहे. त्यावर केलेल्या पोस्ट नुसार, 'सुशांत आपल्यापासून खूप दूर निघून गेला आहे. तुम्ही फॅन्सचं त्याचे खरे 'गॉडफादर' होतात. त्याला दिलेल्या वचनानुसार आता त्याची अकाऊंट्स ही #SelfMusing mode मध्ये बदलली जाणार आहेत. यामध्ये त्याचे विचार, स्वप्न, आशा-अपेक्षा याचा ठेवा शेअर केला जाईल. त्यामागे मागे ठेवलेल्या सार्‍या सकारात्मक गोष्टी आता शेअर केल्या जातील. त्यासोबतच "I'm noun in your life, verb in mine." हा कोट शेअर करण्यात आला आहे.

Sushant Singh Rajput's Musings

सुशांत सिंह राजपूत हा बालाजी टेलिफिल्मच्या 'पवित्र रिश्ता' मालिकेतून रसिकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर बॉलिवूडमध्ये 'काय पो छे, एमएसधोनी - अनटोल्ड स्टोरी, छिछोरे सारख्या दर्जेदार सिनेमात त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. अनेकांनी त्याच्या शैलीची प्रशंसादेखील केली. मात्र नैराश्यात असलेल्या त्याने अचानक जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आणि सार्‍यांच्याच मनाला चटका लावून गेला.