रिंकू राजगुरु हिची बारावीच्या परीक्षेत 'सैराट' कामगिरी; पहा किती टक्के मिळाले गुण
Rinku Rajguru (Photo Credits: Facebook)

Rinku Rajguru Pass in HSC Board Exam 2019: 'सैराट' (Sairat) या लोकप्रिय सिनेमातून अवघ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) हिचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. रिंकू राजगुरु ही बारावीच्या परिक्षेत 82 टक्क्यांनी उत्तीर्ण झाली आहे. रिंकू राजगुरु हिला बारावीत 650 पैकी 533 गुण मिळाले आहेत. मराठी- 86, भुगोल- 98, इतिहास- 86, राज्यशास्त्र- 83, अर्थशास्त्र- 77 तर पर्यावरण स्टडी विषयात 49 असे गुण मिळाले असून सरासरी 82% गुण मिळाले आहेत.

दहावीला रिंकूला 66% गुण मिळाले होते. त्यानंतर आता बारावीत रिंकू काय कमाल करते? याची उभ्या महाराष्ट्राला उत्सुकता होती.

नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमाने रिंकूला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. याच लोकप्रियतेमुळे तिला शाळेत जाणेही कठीण होऊ लागले आणि तिला 10 व्या च्या वर्षात शाळा सोडावी लागली. त्यानंतर रिंकूने 17 नंबरचा फॉर्म भरुन दहावीची परीक्षा दिली. तिचा दहावीचा निकाल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (रिंकू राजगुरु हिला त्रास नको म्हणून अतिरिक्त पोलीस तैनात; आर्चीला पाहण्यासाठी गर्दी तर होणारच!)

काहीच दिवसांपूर्वी रिंकू राजगुरु हिचा 'कागर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने प्रेक्षकांवर सैराटसारखी जादू केली नसली तरी रिंकूच्या भूमिकेची जोरदार चर्चा मात्र झाली. त्यानंतर आता रिंकूच्या 'मेकअप'Sairat सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' सिनेमातही रिंकू-आकाश ही जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे.

12 वी चा टप्पा हा सर्वच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. 12 वी च्या निकालानंतरच करिअरची दिशा ठरवली जाते. त्यामुळे या निकालानंतर रिंकू राजगुरु नेमकं काय करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.