'सैराट' फेम रिंकू राजगुरू ठरली मराठी मधील सर्वात महागडी अभिनेत्री; 'मेकअप'साठी घेतले इतके मानधन
रिंकू राजगुरू (संग्रहित-संपादित प्रतिमा)

‘सैराट’ (Sairat) फेम रिंकू राजगुरू (Rinku Ranjguru) म्हणजेच आर्ची, अवघ्या एका चित्रपटामुळे घराघरात पोहचली. आता फक्त मराठीमध्येच नाही तर राज्याबाहेरही तिचे अनेक चाहते आहेत. रिंकूची लोकप्रियता पाहता आजच्या घडीला निर्माते चित्रपटासाठी तिला हवी ती रक्कम द्यायला तयार होत आहेत. म्हणूनच रिंकू ही मराठीमधील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी अशा अभिनेत्रींना मागे टाकत रिंकूने आगामी ‘मेकअप’ (Makeup) चित्रपटासाठी सर्वात जास्त मानधन घेतले आहे.

कागर नंतर आता रिंकूचा तिसरा मराठी चित्रपट येत आहे. गणेश पंडित यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. मराठीमधील विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मेकअप या चित्रपटासाठी रिंकूने तब्बल 27 लाख मानधन घेतले आहे. हे मानधन कोणत्याही मराठी कलाकाराला मिळणाऱ्या मानधनापेक्षा सर्वात जास्त आहे. सध्याच्या आघाडीच्या तारका एका चित्रपटासाठी साधारण 15 लाख रुपये घेतात. रिंकूच्या मेकअपचा या आगामी चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.  

सैराटला तीन वर्षे उलटूनही त्याचे गारुड लोकांच्या मनावरून उतरले नाही. रिंकूने जेव्हा आर्ची साकारली तेव्हा ती 9 वीमध्ये शिकत होती, आता ती 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे, सोबतच एक अभिनेत्री म्हणूनही तिने चांगलाच ठसा उमटवला आहे. पहिल्याच चित्रपटामुळे तिला जे स्टारडम मिळाले ते क्वचितच कोणत्या मराठी अभिनेत्रीला मिळाले असावे. म्हणूनच आपल्या मानधनामध्ये रिंकूने इतकी वाढ केली आहे.