धक्कादायक : कुख्यात गुन्हेगारांवर चित्रित झाले 'मुळशी पॅटर्न' चित्रपटाचे गाणे
मुळशी पॅटर्न (Photo credit : lokasatta)

चित्रपटामधील आयटम सॉंग हे चित्रपटाला हिट बनवण्याचा नामी फॉर्मुला समजला जातो. अगदी बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा इतिहासकालीन चित्रपटांमध्यही या गोष्टीचा वापर करण्यात आला. आता हिंदी मधील हा ट्रेंड मराठीमध्येही दिसून येतो. कारण सध्या वेगवेगळ्या समारंभांत, उत्सवात अशा आयटम सॉंगची चलती दिसून येते. नुकतेच ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटात आयटम सॉंगच्या अगदी विरुद्ध प्रकार म्हणजेच भाईटम सॉंग दिसून आले. मात्र सगळ्यात धक्कादायक प्रकार म्हणजे हे गाणे मुळशीतल्या प्रत्यक्ष कुख्यात गुन्हेगारांना घेऊन चित्रित करण्यात आले आहे.

मुळशीच्या गुन्हेगारीवर आधारित असलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित करीत आहेत. तसंच गुन्हेगारी किती वाईट आणि त्याचा शेवट कसा होतो हे या चित्रपटात दाखवण्यात आलंय. मुळशी हा वारकऱ्यांचा, उद्योजकांचा तालुका आहे. याला गुन्हेगारीचं स्वरूप कसं आलं हा या चित्रपटाचा केंद्र बिंदू आहे. मात्र आता हेच दाखवण्यासाठी खुनासारखे गंभीर गुन्हे असलेल्या टोळ्या चालवणाऱ्या गुंडांना घेऊन चित्रीकरण करून गुम्हेगारांचे उद्दात्तीकरण कसे काय करण्यात आले? अशा प्रकारच्या प्रश्नांची झोड उठत आहे.

नुकतेच समोर आलेल्या टीजरमध्ये आणि गाण्यामध्ये मोक्काचा आरोपी अमोल शिंदे हा तलवारीने केक कापताना दिसून येत आहे. अमोल शिंदेवर खून, दरोडा, घातक शस्त्र बाळगण्याचे 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पुण्यातल्या कुख्यात गुम्हेगारांपैकी एक विठ्ठल शेलारही येथे दिसून येतो. प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांचं अपहरण करून, त्यांचे खून करून मृतदेह जाळल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

गुन्ह्याशी निगडीत कथा असलेल्या चित्रपटामध्ये प्रत्यक्ष गुन्हेगारांना घेऊन चित्रीकरण करण्यामागे दिग्दर्शकाचा नेमका काय हेतू असावा? असे प्रश्न विचारले जात आहेत.

लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना याबाबत विचारले असता, ‘ज्या गुन्हेगारांना सहभागी करण्यात आलय त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल होते याबद्दल आपल्याला माहिती नव्हतं. तसंच ज्या गावात चित्रिकरण करण्यात आलं तेथील लोकांना सहभागी करावेच लागणार होते म्हणून या लोकांसोबत चित्रीकरण करण्यात आल्याचे’ त्यांनी सांगितले.

या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले असून नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे.  प्रणीत कुलकर्णी यांनी ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ या गाण्याचे बोल लिहिलेले आहेत.