अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक आज (16 एप्रिल) पार पडणार आहे. सकाळी 9.30 वाजल्यापासून या मतदानाला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत रंगकर्मी आपला मतदानाचा अधिकार बजावू शकणार आहेत. प्रसाद कांबळी विरूद्ध प्रशांत दामले यांचे पॅनल एकमेकांविरूद्ध उभे ठाकले आहे. हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीचे मतदान आहे. 60 जागांसाठी 28 हजार मतदार आहेत.
प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूह समोर प्रसाद कांबळी यांचे 'आपलं पॅनेल' आहे. अपक्षांसह 103 जण निवडणूकीच्या रिंगणात आहेत. भाऊसाहेब भोईर, मेघराज राजेभोसले, सुहास जोशी, सुरेश धोत्रे, शंकर रेगे, सत्यजित धांडेकर, समीर हम्पी यांच्यासह 20 उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान या निवडणूकीचा निकाल आज रात्री उशिरा जाहीर होणार आहे.
नाट्यकर्मींच्या या निवडणूकीमध्ये यंदा राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप देखील करण्यात आल्याने ही निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनला आहे. उदय सामंत यांचा दामले गटाला पाठिंबा असल्याची चर्चा आहे. तर प्रसाद कांबळी यांच्या 'आपलं पॅनल' सोबत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असल्याचीही चर्चा आहे. पण शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करत विश्वस्त या नात्याने निष्पक्षपाती राहून कोणत्याही पॅनेलला पाठिंबा जाहीर न करण्याची माझी भूमिका आहे. असं म्हटलं आहे. दामले यांच्या गटात सारेच दिग्गज कलाकार आहेत तर कांबळी यांच्या पॅनल मध्ये कलाकारांसह रंगमंच कामगारही आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक फारच अटीतटीची झाली आहे. राज्यातील 52 नाट्यगृहे होणार सर्व सोयीसुविधांसह सुसज्ज; प्रशांत दामले यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नियुक्ती .
प्रशांत दामले यांचे पॅनल
प्रसाद कांबळी पॅनल
मुंबईमध्ये यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा आणि साहित्य संघ मंदिर, गिरगाव या दोन मतदान केंद्रावर आज मतदान करता येणार आहे. मुंबई सह राज्यात 29 केंद्रांवर मतदान होणार आहे. गेली पाच वर्षे प्रसाद कांबळी यांचे नाट्य परिषदेवर वर्चस्व होते. पण त्यांच्या कारकीर्दीमध्ये काही वाद झाल्याने आता ही निवडणूक अनेक दृष्टीने महत्त्वाची बनली आहे.