कदर खान (Photo Credits: Facebook)

बहारदार अभिनय आणि उत्कृष्ठ संवाद फेक यामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता कादर खान ( Kader Khan) यांची प्रकृती गंभीर आहे. ते 81 वर्षांचे आहेत. कॅनडातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डर (Progressive Supranuclear Palsy Disorder) या आजारामुळे त्यांच्या मेंदूला कार्य करताना अडथळे येत आहेत. तसेच, खान यांना श्वस घेण्यासही अडथळा येत आहे. त्यांना BiPAP व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. कादर खान गेली अनेक वर्षे त्यांचा मुलगा सरफराज आणि सून शाइस्ता यांच्यासोबत कॅनडा (Canada) येथे राहात आहेत. 2015 मध्ये आलेला चित्रपट 'दिमाग का दही'मध्ये त्यांनी काम केले होते. त्यानंतर भव्य पडद्यावर त्यांचे दर्शन घडले नाही.

कादर खान यांनी आपल्या आयुष्यातील सुमारे 45 वर्षे बॉलिवूडला दिली. या काळात त्यांनी 300हून अधिक चित्रपटांत अभिनय केला. तर, 250 पेक्षाही अधिक चित्रपटांसाठी संवाद लेखण केले. सध्या त्यांच्यावर कॅनडा येथे उपचार सुरु आहेत. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार खान यांची प्रकृती चिंताजनक आहे. श्वसनास अडथळा निर्माण झाल्याने त्यांना कृत्रिम श्वासासाठी व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. (हेही वाचा, मालमत्तेसाठी दिलीप कुमार यांना धमक्या; सायरा बानो यांनी मागितली नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत)

दरम्यान, 2017मध्ये कादर खान यांच्यांवर गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे ते अधिक काळासाठी चालू शकत नव्हते. आपण चाललो तर खाली पडू अशी भीत खान यांना वाढत होती. गेली बराच काळ त्यांची प्रकृती खालावत आहे.