मालमत्तेसाठी दिलीप कुमार यांना धमक्या; सायरा बानो यांनी मागितली नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत
सायरा बानो आणि दिलीप कुमार (Photo credit : Facebook)

अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्या सध्याच्या प्रकृतीबद्दल सर्वांनाच कल्पना आहे. अशातच गेले काही दिवस त्यांच्या मालमत्तेबाबतीतही बातम्या येत होत्या. एक बिल्डर दिलीप कुमार व त्यांची पत्नी सायरा बानो (Saira Banu) यांना धमक्या देत असल्याची माहिती मिळाली होती. समीर भोजवानी नावाची व्यक्ती मालमत्तेसाठी आपल्याला धमकावत असल्याचा आरोप सायरा बानो यांनी केला होता. त्यानंतर ही व्यक्ती जेलमध्ये होती मात्र आता तो जेलमधून सुटून बाहेर आला असल्याने दिलीप कुमार आणि सायरा बानो यांना भीती वाटत आहे, म्हणूनच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. 18 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या विकासकामाच्या भूमिपूजनासाठी मुंबईला येणार आहेत. त्यावेळी भेटण्याची वेळ द्यावी अशी विनंती सायरा बानो यांनी केली आहे.

दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरून सायरा बानो यांनी हे ट्विट केले आहे. ‘समीर भोजवानी हा तुरुंगातून सुटला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मदतीचे आश्वासन दिल्यानंतरही याविरोधात कोणतीही पावले उचलली गेली नाही. पद्म विभूषित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या दिलीप कुमार यांचा विश्वासघात करण्यात आला आहे. तरी कृपया आपण मुंबईमध्ये भेटण्यासाठी वेळ द्यावी’ अशा आशयाचे हे ट्विट आहे. (हेही वाचा : जाणून घ्या दिलीप कुमार यांच्या जीवनातील काही महत्वाच्या गोष्टी)

प्रॉपर्टी हडपण्यासाठी समीर भोजवानी याने बोगस कागदपत्र बनवली, यातच काही सरकारी कर्मचारी समीर भोजवानीला मदत करत असल्याचा आरोप सायरा बानो यांनी केला आहे.