Sonu Sood (Photo Credits: Twitter)

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूद  (Sonu Sood) याचे मदतकार्य अद्याप अविरतपणे सुरु आहे. आता सोनू सुद गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जावू इच्छिणाऱ्या मजूरांना घरी परतण्यासाठी मदत करत आहे. 22 ऑगस्टपासून गणेशोत्सवाची धूम सुरु होईल. गणेशोत्सवानिमित्त अनेक लोक आपल्या मूळ गावी जातात. दरम्यान कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे अनेक मजूरांना घरी पाठवण्यासाठी सोनू सूद मदत करत आहे. अलिकडेच सोनू सूद याने 300 लोकांना आपल्या मूळ गावी परत पाठवले आहे. लवकरच तो अजून काही लोकांना घरी परतण्यासाठी मदत करणार आहे.

सोनू सूद याने मुंबई मिररला दिलेल्या माहितीनुसार, लालबाग आणि सिद्धिविनायक मंदिराजवळ राहणारे अनेक मजूरांना घरी पाठवण्याची मदत करण्यात आली आहे. त्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली असून त्यात 300 मजूरांना गावी पाठवण्यात आले. त्यानंतर आता लवकरच काही मजूरांना घरी पाठवण्यात येईल. (अभिनेता सोनू सूद ने 22 वर्षीय मुलीला गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी केली आर्थिक मदत)

त्याचबरोबर परदेशात अडकलेल्या काही मेडिकलच्या विद्यार्थ्यांना परत देशात आणण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत तब्बल 11 हजार विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. यापूर्वी सोनू सूद याने कोविड-19 लॉकडाऊनच्या कठीण काळात स्थलांतरित मजूरांना केलेल्या मदतीचे अनेक स्तरातून कौतुक झाले आहे. तर त्यावर काहींनी प्रश्न, शंकाही उपस्थित केल्या आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत सोनू सूद याने आपले मदतकार्य सुरु ठेवले आहे. दरम्यान, रक्षाबंधनाची भेट म्हणून सोनू सूद याने जलपयीगुडी येथील एका महिलेला घर बांधून देण्यास मदत करणार असल्याचे सांगितले होते.