Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये बेहाल झालेल्या स्थलांतरीत मजूरांसाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) देवदूत ठरला. तेव्हापासून सुरु झालेला मदतीचा ओघ अद्याप सुरुच आहे. आज राखी पौर्णिमेचा सण देशभरात साजरा केला जात आहे. याच रक्षाबंधनानिमित्त अभिनेता सोनू सूद याने जलपयीगुडी (Jalpaiguri) येथील एका महिलेला घर बांधून देण्यास मदत करणार असल्याचे सांगितले आहे.

सोनल सिंग या युजरने एका महिलेची आर्थिक परिस्थितीमुळे झालेली बिकट अवस्था दाखवणारा व्हिडिओ शेअर केला होता. तसंच सोनू सूद याला टॅग करुन या महिलेची मदत करावी असे म्हटले होते. यासाठी केलेल्या ट्विटमध्ये सोनल सिंग यांनी म्हटले, "सोनू सूद सर हे कुटुंब आसाममधील जलपयीगुडी येथील आहे. या महिलेच्या पतीचं निधन झालं असून या महिलेला एक लहान मुलगा आहे. या मुलाचं पोट भरण्यासाठीही या महिलेकडे काहीच नाही. तसंच पावसाळ्यात या स्त्रीचे अत्यंत हाल होतात. त्यामुळे तुम्हीच एक आशेचा किरण आहात. शक्य असल्याच या कुटुंबाला मदत करा." (अभिनेता सोनू सूदने बर्थ डे दिवशी 3 लाख नोकरींची केली घोषणा; Amazon, Sodexo सह बड्या कंपन्यांसोबत करार)

हा व्हिडिओ सोनू सूद याने पाहिल्यानंतर रक्षाबंधनानिमित्त जलपायगुडी येथील या बहिणीचे घर बांधून देऊया असे म्हटले आहे. सोनल सिंग यांच्या व्हिडिओला उत्तर देताना सोनू सूद याने लिहिले, "चला आज रक्षाबंधना निमित्त जलपायगुडी येथील आपल्या बहिणीचे नवे घरं बांधुया."

पहा व्हिडिओ:

स्थलांतरीत मजूरांना स्वगृही पाठवण्यासाठी सोनू सूद याने केलेल्या मदतीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसंच त्याच्यावर अनेक बाजूने टीकाही करण्यात आली. अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र त्यामुळे सोनू सूद याने आपले मदत कार्य थांबवलेले नाही.