Rahul bose banana video at JW Marriot (Photo Credits: Twitter)

राहुल बोस (Rahul Bose) हिंदी, बंगाली तसेच इंग्रजी भाषेतील चित्रपटांमधील एक लोकप्रिय नाव. त्याच्या हटके भूमिकांमुळे त्याचा स्वतःचा असा चाहता वर्ग आहे. नुकतेच राहुलला पंचतारांकित हॉटेलमधील लुटमारीचा एक अनुभव आला. हा अनुभव त्याने एका व्हिडिओद्वारे ट्विट करत लोकांपर्यंत पोहचवला आहे. चंदिगढ मधील या हॉटेलने राहुलला अवघ्या दोन केळांसाठी तब्बल 442 रुपये दर आकाराला आहे. या गोष्टीचे बिलही राहुलन व्हिडिओमध्ये दाखवले आहे. सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तर चंदिगढ येथे एका शूटमध्ये राहुल व्यस्त आहे. आपल्या चंदिगढमधील वास्तव्यादरम्यान राहुल पंचतारांकित हॉटेल जे डब्ल्यू मॅरियट (J W Marriott) येथे मुक्कामास आहे. एके सकाळी जिम नंतर राहुलने हॉटेलकडे दोन केळांची मागणी केली. केळी पाठवण्यात आली, त्या सोबत बीलदेखील आले. हे बिल पाहून राहुल चक्रावून गेला आहे. कारण हॉटेलने दोन केळांसाठी राहुलला 442 रुपयांचे बिल पाठवले होते.

राहुलने ताबडतोप या गोष्टीचा व्हिडीओ बनवून आपली मते व्यक्त केली आहेत. व्हिडीओमध्ये सुरुवातीला राहुल हॉटेलने किती चांगल्या प्रकारची रूम दिली आहे हे दर्शवतो त्यानंतर टेबलवर ठेवलेली दोन केळी आणि बिल दिसते. हा व्हिडीओवर अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. काहींनी या गोष्टीचा निषेध केला आहे, तर काहींनी ‘परवडत नसेल तर अशा महागड्या हॉटेलमध्ये राहू नये’ असा सल्ला दिला आहे. जे डब्ल्यू मॅरियटने अजूनतरी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.