बॉलिवूडचा हरहुन्नरी कलाकार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांनी रविवारी (14 जून) ला वांद्रयाच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूडसह देश हळहळला. सुशांतच्या चाहत्यांपासून राजकीय, क्रिडा, सिनेविश्वातील अनेक लोकांनी शोक व्यक्त केला. सुशांतचे संपूर्ण कुटूंब शोकसागरात बुडाले असून त्याच्या तमाम चाहत्यांवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आत्महत्येबाबत सर्वांना शंका असून निर्माते मुकेश भट (Mukesh Bhatt) यांनी त्याच्या आत्महत्येबाबत धक्कादायक विधान केले आहे. "सुशांतशी काही दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेनंतर त्याच्यासोबत काहीतरी चुकीचे घडत आहे याचा मला अंदाज आला होता" असे एका खाजगी वाहिनीशी बोलताना सांगितले.
निर्माते मुकेश भट यांनी सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकून सुन्न झाले. यावर त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, "मी त्याच्याशी बोललोही होतो. तेव्हाच मला वाटलं होतं की, त्याच्यासोबत काहीतरी चुकीचं होत आहे. आम्ही ‘सडक 2’ मध्ये सोबत काम करण्याची योजना आखत होतो", असेही ते पुढे म्हणाले. Sushant Singh Rajput Funeral: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यावर आज मुंबई मध्ये होणार अंत्यसंस्कार
दिग्दर्शक महेश भट्ट यांचा सुपरहिट सिनेमा ‘सड़क’चा रिमेक येणार आहे. यामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट, कुणाल रॉय कपूर, संजय दत्त आणि पूजा भट्टही दिसणार आहे.
सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असे म्हटले जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. 2009 मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला होता. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.