Pankaj Tripathi's Brother-in-law Died in Accident: पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचा रस्ता अपघातात मृत्यू; बहीण सरिता गंभीर जखमी
Pankaj Tripathi (PC - Instagram)

Pankaj Tripathi's Brother-in-law Died in Accident: बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या शनिवारी, पंकजची बहीण सरिता तिवारी आणि मेहुणा राकेश तिवारी (Rakesh Tiwari) उर्फ ​​मुन्ना तिवारी यांचा एक भीषण रस्ता अपघात झाला. यात अभिनेत्याच्या मेहुण्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पंकज त्रिपाठी यांची बहीणही झारखंडमध्ये एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, या अपघातात राकेश तिवारी यांना जीव गमवावा लागला, तर सरिता तिवारी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर धनबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या SNCU मध्ये उपचार सुरू आहेत. राकेश तिवारी आणि त्यांची पत्नी सरिता तिवारी बिहारमधील गोपालगंजमधील कमालपूर येथून पश्चिम बंगालमधील चित्तरंजनला जात होते. दुर्दैवाने निरसा मार्केट चौकात येण्यापूर्वी त्यांची भरधाव वेगाने जाणारी कार (WB44D-2899) दुभाजकावर आदळली, त्यामुळे कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. (हेही वाचा -अभिनेता पंकज त्रिपाठी 'Main Atal Hoon'च्या टीमसोबत सिद्धिविनायक मंदिरात)

पोलिसांनी आणि स्थानिक लोकांनी दोघांना वाचवले आणि धनबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेले. अनेक प्रयत्न करूनही राकेश तिवारी यांना वाचवता आले नाही, तर सरिता तिवारी यांना गंभीर अवस्थेत सर्जिकल आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.

दरम्यान, चिराग पासवान यांनी देखील ट्विट करून अभिनेत्याच्या मेहुण्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि लोकांना या दुःखद घटनेची माहिती दिली. धनबादच्या निरसा येथील जीटी रोडजवळ शनिवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला.